नांदेड (प्रतिनिधी) – विमानतळ पोलीस ठाण्याच्या पथकाने घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरीतील सुमारे ₹४८,५०० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसरा नगर परिसरातील एका घरात कुलूप तोडून प्रवेश करून डेल कंपनीचा लॅपटॉप, सोन्या-चांदीचे दागिने तसेच अन्य मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मोहम्मद ओवैस मोहम्मद असगार शेख (वय १९, रा. आसरा नगर, नांदेड) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरीतील लॅपटॉप, सोन्याची व चांदीची दागिने असा सुमारे ₹४८,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यातील उर्वरित मुद्देमालाचा शोध सुरू असून अधिक तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलम रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे व त्यांच्या पथकाने केली.
Post Views: 12