मुंबई लुटली, राम मंदिरातील पैशांवरही डल्ला:नाना पटोलेंची भाजप-महायुतीवर सडकून टीका, न्यायालयाने स्वतःहून दखल घेण्याची मागणी




चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणाची न्यायालयाने स्वतःहून दखल घ्यावी, अशी मागणी केली. याचवेळी त्यांनी राम मंदिर निधीतील कथित गैरव्यवहार, शेतकरी कर्जमाफी आणि विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना फोडण्याच्या राजकारणावरूनही भाजप आणि महायुती सरकारवर निशाणा साधला. मुंबईच्या विकासाचे स्वप्न दाखवून महापालिका ताब्यात घेतली, पण पैसा लुटला नाना पटोले म्हणाले की, भाजप आणि महायुतीने मुंबईच्या विकासाचे आश्वासन देत मुंबई महापालिकेवर नियंत्रण मिळवले. मात्र, देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेचा निधी विकासासाठी न वापरता भ्रष्टाचारासाठी वापरण्यात आला. “मुंबईकरांच्या कराच्या पैशातून महापालिकेत आणि राज्य सरकारकडे मोठा निधी जमा होतो. पण या पैशाची लूट सुरू आहे. त्याचाच परिणाम म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईची अवस्था बिकट झाली आहे,” असा आरोप त्यांनी केला. ‘मान्सूनपूर्व कामे झाली असती तर मुलाचा जीव गेला नसता’ चेंबूरमधील दुर्घटनेचा उल्लेख करत पटोले म्हणाले की, पावसाळ्यापूर्वी झाडांच्या धोकादायक फांद्या छाटणे, रस्ते आणि नाले दुरुस्त करणे अशी आवश्यक कामे झाली नाहीत. “काल एका निष्पाप विद्यार्थ्याचा जीव गेला. ही सरकारची जबाबदारी आहे. पण सरकार कोणतीही जबाबदारी स्वीकारायला तयार नाही,” असे ते म्हणाले. ‘न्यायालयाने सुओ मोटो दखल घ्यावी’ राज्य सरकारवर गंभीर आरोप करत नाना पटोले म्हणाले की, “हे सरकार भ्रष्टाचारात इतके बुडाले आहे की जनतेच्या प्रश्नांकडे त्यांचे लक्षच नाही. त्यामुळे माननीय न्यायालयाने या घटनेची स्वतःहून दखल घ्यावी आणि सरकारला धडा शिकवावा.” त्यांनी पुढे आरोप केला की, “मुंबईपासून संपूर्ण महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे वातावरण निर्माण झाले आहे. हे 55 टक्के कमिशन घेणारे सरकार असून त्याला न्यायालयाने चाप लावला पाहिजे.” ‘जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी आमदार-खासदार फोडण्याचे काम’ राजकीय घडामोडींवर भाष्य करत पटोले यांनी महायुतीवर विरोधी पक्षातील आमदार आणि खासदारांना आपल्या बाजूला ओढण्याचा आरोप केला. “सरकारकडे प्रचंड बहुमत आहे. तरीही जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी इतर पक्षांचे आमदार-खासदार फोडण्याचे काम सुरू आहे. भ्रष्टाचारातून मिळालेल्या पैशांचे प्रलोभन दाखवून हे राजकारण सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला. ‘राम मंदिर प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न’ राम मंदिर निधीतील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करत पटोले म्हणाले की, विरोधी पक्षातील नेत्यांना पक्षात आणण्यामागे जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न आहे. “राम मंदिरात डाका पडल्याचे आरोप होत आहेत. त्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी हे लोक आमदार-खासदार फोडण्याचे राजकारण करत आहेत. लोकांच्या श्रद्धेचा पैसा लुटला गेला असून त्यावरून चर्चा होऊ नये म्हणून वेगळे विषय पुढे आणले जात आहेत,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. ‘शेतकरी कर्जमाफीचे आश्वासनही हवेतच’ शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरही नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. “मागील अधिवेशनात मुख्यमंत्री शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू, सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते. पण आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. मुख्यमंत्री सातत्याने खोटी आश्वासने देत आहेत. ते राज्यातील शेतकरी आणि जनतेची फसवणूक करत आहेत,” अशी टीका त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *