![]()
वसमत तालुक्यातील अवैध गौणखनीज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर तहसीलदार शारदा दळवी यांच्या पथकाने धडक कारवाईची मोहिम हाती घेतली असून मागील १० महिन्यात ४४ वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्यावर ६८ लाख रूपयांचा दंड लावण्यात आला आहे. या कारवाईमुळे वसमत तालुक्यात अवैध गौण खनीज वाहतूकीला आळा बसल्याचे चित्र आहे. वसमत तालुक्यातील वाळू घाटांवरून मागील काही दिवसांत अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक केली जात असल्याचे चित्र होते. रात्रीच्या वेळी वाळू वाहतूक करणारी वाहने भरधाव वेगाने वाहने चालवित असल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता. या शिवाय त्यातून शासनाचा महसूल देखील बुडत होता. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार शारदा दळवी यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या मार्गदर्शनाखाली पथके स्थापन केली. या पथकांमध्ये मंडळ अधिकारी, तलाठी यांचा समावेश आहे. या शिवाय स्थानिक पातळीवर कोतवाल व पोलिस पाटील यांच्याकडूनही माहिती घेण्यास सुरवात करण्यात आली. दरम्यान, वसमत तालुक्यातील वाळू घाटांवर तहसीलदार दळवी यांनी स्वतः भेटी देऊन पाहणी केली शिवाय पथकांच्या माध्यमातून दिवसा व रात्रीच्या वेळी वाहनांची तपासणीही सुरु करण्यात आली होती. या तपासणीमध्ये मागील १० महिन्यात अवैध गाैणखनीज वाहतूक करणारे ४४ वाहने तपासण्यात आली. या वाहन चालकांकडे कुठल्याही प्रकारची परवानगी नसल्याने सदर वाहने जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये अवैधरित्या वाळू वाहतूक करणारी २७ वाहने जप्त करून ३६.६१ लाख रुपये दंड लावण्यात आला आहे. मुरूम वाहतूक करणारी ११ वाहने जप्त करून २.४१ लाख रुपये, माती वाहतूक करणाऱ्या २ वाहनांवर कारवाई करून ४.५२ लाख रुपये तर दगड वाहतूक करणाऱ्या ४ वाहनांवर कारवाई करून १.०५ रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. दरम्यान, तालुक्यात होणाऱ्या या कारवाईमुळे वाळूतस्करांचे धाबे दणाणले असून आता लगतच्या नांदेड जिल्हयातून वाळू आणली जात आहे. त्यामुळे आता या वाहनांवर कारवाईसाठी नांदेड मार्गावरून येणाऱ्या वाहनांची तपासणीही हाती घेण्यात आली असल्याचे सुत्रांनी सांगितले.
अवैध गौणखनीज वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा:10 महिन्यात 44 वाहनांवर कारवाई, वसमतच्या पथकाची कामगिरी
