![]()
अजिंठा व जामनेर वनक्षेत्राच्या हद्दीत तोंडापूर धरणाच्या काठावर ३ रोही (नीलगाय) कुजलेल्या अवस्थेत मृत आढळून आले आहेत. धरणाच्या काठावर लपवून ठेवलेल्या २३ घातक रसायनांच्या ड्रममधून झालेल्या गळतीमुळेच हा प्रकार घडल्याचा संशय आहे. यापूर्वी धरणातील मासे आणि तोंडापूर गावातील ८ ते १० शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी याच रसायनांमुळे दगावले होते. आता हाच प्रादुर्भाव वन्यजीवांपर्यंत पोहोचल्याची शंका डॉ. संतोष पाटील यांनी व्यक्त केली आहे. अजिंठा वनविभागाच्या हद्दीतून गायब झालेले २३ घातक रसायनांचे ड्रम शोधण्यात आलेले नाहीत. हे ड्रम परिसरात लपवून ठेवले असून, पावसाच्या पाण्यासोबत रसायन धरणात मिसळत असल्याचा संशय डॉ. पाटील व भूषण कानडे यांनी व्यक्त केला. वनविभागाने अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असला, तरी ड्रम शोधण्यास हालचाली केलेल्या नाहीत. त्यातच पहूर किंवा फर्दापूर पोलिसांशी कोणताही संपर्क साधलेला नाही. Ãधरणात मृत मासे व रोहीचे मांस खाताना ब्लॅक नेक आयबीस आणि आययूसीएनच्या रेड लिस्ट मधील संकटग्रस्त एशियन उली नेक स्टॉर्क हा दुर्मिळ पक्षी आढळून आला आहे. मृत प्राण्यांमधील विषारी घटक या पक्षांच्या पोटात गेल्यास अन्नसाखळी उद्ध्वस्त होईल. – डॉ. संतोष पाटील वन्यजीव संवर्धक, सिल्लोड)
तोंडापूरच्या धरण काठावर घातक रसायनाची गळती:तीन रोही मृत्युमुखी, पक्षी व वन्यजीवांवर संकट
