जिल्हाधिकाऱ्यांकडे देशी बार व्यवस्थापन’ची मागणी; अर्जदारांचा प्रशासनाला अनोखा सल्ला!

0
WhatsApp-Image-2026-03-30-at-16.51.08.jpeg

नांदेड (प्रतिनिधी) – नायगाव तालुक्यातील देशी दारू दुकानांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा मुद्दा पुढे करत स्थानिक कार्यकर्त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे. या अनोख्या मागणीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चेला उधाण आले आहे.

लोकस्वराज्य आंदोलनाचे कार्यकर्ते रावसाहेब पवार (रा. रुई बु., ता. नायगाव) व गणपत रेड्डी (रा. टाकळी बु., ता. नायगाव) यांनी दिलेल्या निवेदनात नायगाव तालुक्यातील सुमारे ११ देशी दारू दुकानांमध्ये पिण्यासाठी स्वच्छ पाणी, टेबल-खुर्च्या, बसण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह व बाथरूम यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनासोबत विविध गावांतील दारू दुकानांचा सविस्तर निरीक्षण अहवालही सादर करण्यात आला आहे. काही ठिकाणी ग्राहकांना उभ्याने दारू प्यावी लागते, काही ठिकाणी पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते, तर अनेक ठिकाणी बसण्याची सुविधा नसल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. काही दुकानांमध्ये आवश्यक बोर्ड, लायसन्स क्रमांक व मूलभूत सुविधा नसल्याची तक्रारही करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रशासनातील जाणकारांच्या मते अशा प्रकारच्या सुविधा पुरविण्याचा विषय हा प्रामुख्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यक्षेत्रात येतो. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे थेट अशा मागण्या करणे हे नियमपुस्तकाबाहेरील पाऊल मानले जात आहे. यामुळे अधिकाऱ्यांमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहे.

या निवेदनाची स्थानिक पातळीवर चर्चा रंगली असून काही नागरिकांनी याला “ग्राहक हक्क चळवळ की दारू सुविधा अभियान?” असा उपरोधिक प्रश्न उपस्थित केला आहे. तर काहींनी पुढे चहा टपऱ्यांसाठीही एसी व पार्किंगची मागणी होणार का, अशी मिश्कील प्रतिक्रिया दिली आहे.

निवेदनाच्या प्रती राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयालाही देण्यात आल्या असून, मागण्या पूर्ण न झाल्यास जनआंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नसली तरी संबंधित विभागाकडून नियमांनुसार पुढील कार्यवाही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *