![]()
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या कार्याचे कौतुक केले. ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’ ची जबाबदारी स्वीकारून कुमार सप्तर्षींनी गांधी विचार नव्या पिढीत कसा प्रसृत होईल, याची काळजी घेतली. आज या संस्था जपल्या पाहिजेत, कारण त्या केवळ संस्था नसून विचारधारा आहेत. महात्मा गांधीजींचा विचार जतन करणे आणि तो वाढवणे हे व्रत म्हणून कुमार सप्तर्षींनी स्वीकारले होते, असे मत पवार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि युवक क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. कुमार सप्तर्षी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी बालगंधर्व येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. सप्तर्षी हे महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष, युवक क्रांती दलाचे संस्थापक, माजी आमदार आणि सत्याग्रही मासिकाचे संपादक होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. कबीर उमा कुमार, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त शिवाजीराव कदम आणि सचिव अन्वर राजन उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अॅड. अंकुश काकडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, पुण्यात अनेक मान्यवरांनी स्थापन केलेल्या संस्थांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणारा एक वर्ग अलीकडे दिसत आहे. अशा वर्गापासून गांधींचा विचार वाचवणे आवश्यक आहे. कुमार सप्तर्षींचा दुष्काळी भागातील शेतकरी आणि तरुण-तरुणींना मदत करता येईल, असे धोरण सरकारने आखावे, असा आग्रह विधिमंडळात आणि सत्ताधारी पक्षाकडे सातत्याने असायचा. ते एक काम करणारे, नव्या पिढीचा आत्मविश्वास वाढवणारे आणि महात्मा गांधींचा विचार जतन करण्याचे सूत्र घेऊन कष्ट करणारे मोठे नेते होते. आज ते आपल्यात नसले तरी, त्यांचे विचार आणि कार्य आपण अखंडपणे जपले पाहिजे. यावेळी अशोक वानखेडे यांनी सांगितले की, गांधीजींना पूजणारे लोक दिसतात, पण त्यांचे विचार आत्मसात करणारे लोक कमी होत चालले आहेत. पुणे हे बिल्डरांचे शहर मानले जाते, जिथे जमिनीवर बिल्डरांचा डोळा असतो. अशा परिस्थितीत गांधी भवनची गरिमा राखणे ही आपली जबाबदारी आहे. आजच्या काळात सप्तर्षींसारख्या व्यक्तींची अधिक गरज आहे. या श्रद्धांजली सभेत दिलीप वळसे पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, सुभाष वारे, उल्हास पवार, शिवाजीराव कदम, सूर्यकांत पाठक, उपमहापौर परशुराम वाडेकर, आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गजानन थरकुडे, अॅड. एस. के. जैन आदी मान्यवरांनी डॉ. कुमार सप्तर्षींना श्रद्धांजली वाहिली. डॉक्टर कबीर उमा कुमार यांनी आपल्या कौटुंबिक आठवणी सांगत म्हणाले की, मला आडनाव का नाही. कबीर उमा कुमार हे नाव का? असे विचारले तेव्हा बाबा म्हणाले, मुलांच्या जडणघडणीत आई बाबा यांचे योगदान असते. भारतीय ही आपली ओळख. आपल्याला जात, धर्म अशी ओळख नको. धर्म कोणता लावायचा असे विचारले तेव्हा ते म्हणाले की, मानवता. त्यांनी सांगितले की, तु जेव्हा १८ वर्षाचा होशील, तेव्हा जर तुला हे नाव व धर्म बदलायचा असेल तर तसा निर्णय तु घेवू शकतोस. मला मुलगा झाला तेव्हा माझ्या मुलाचे नावापुढे देखील आडनाव लावले नाही. रेहान दिप्ती कबीर असे नाव ठेवले.
कुमार सप्तर्षींनी गांधी विचार नव्या पिढीत नेला:माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षींना श्रद्धांजली सभेत पवारांचे प्रतिपादन
