मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त कार्यक्रम घेण्याची मागणी:पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे मराठवाडा जनविकास संघाचा पुढाकार; शहरात तीन लाख मराठवाडावासी

[ads1]


मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेने विशेष कार्यक्रम आयोजित करावेत, अशी मागणी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी केली आहे. १७ सप्टेंबर हा मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस आहे. केंद्र सरकारने १२ मार्च २०२४ रोजीच्या राजपत्राद्वारे १७ सप्टेंबर हा दरवर्षी ‘हैदराबाद मुक्ती दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. असे असतानाही शहरात महापालिका स्तरावर या दिवशी अपेक्षित कार्यक्रम होत नसल्याबद्दल पवार यांनी नाराजी व्यक्त केली. पवार यांनी सांगितले की, भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला, पण हैदराबाद संस्थानातील जनता त्यानंतरही निजामाच्या राजवटीखाली होती. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले आणि मराठवाड्यासह संबंधित भाग निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला. या मुक्तिसंग्रामात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी लढा दिला आणि बलिदान दिले. त्यांच्या बलिदानाचे स्मरण व्हावे, तसेच या इतिहासाची नव्या पिढीला माहिती मिळावी, यासाठी १७ सप्टेंबरचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे तीन लाख मराठवाडावासी वास्तव्यास असल्याचा दावा पवार यांनी केला. शहरात विविध राष्ट्रीय दिन आणि महापुरुषांच्या जयंती-स्मृतिदिनानिमित्त महापालिका स्तरावर कार्यक्रम घेतले जातात. त्याच धर्तीवर १७ सप्टेंबरनिमित्त हुतात्म्यांना अभिवादन, व्याख्याने, इतिहास प्रदर्शन, विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आणि जनजागृती उपक्रम आयोजित करता येऊ शकतात, असे त्यांनी सुचवले. पवार यांनी नमूद केले की, १७ सप्टेंबर हा केवळ एका प्रदेशाच्या इतिहासाशी संबंधित दिवस नसून, भारताच्या एकात्मतेच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण अध्यायाचे स्मरण करून देणारा दिवस आहे. त्यामुळे या दिवसाकडे राजकीय दृष्टिकोनातून न पाहता इतिहास, स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेतून पाहण्याची गरज आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये व्याख्याने, निबंध स्पर्धा, चित्रफिती, इतिहास प्रदर्शन तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान असे उपक्रम घेऊन नव्या पिढीपर्यंत हा इतिहास पोहोचवावा. ‘महापालिकेच्या माध्यमातून विविध दिवसांचे कार्यक्रम घेतले जातात; मग मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या स्मरणासाठी एक दिवस देणे एवढे कठीण का?’ असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *