![]()
पुणे शहरातील विश्रांतवाडी परिसरात किरकोळ वादातून एका बांधकाम मजुरावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मजूर गंभीर जखमी झाला असून, त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या पत्नीलाही धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. नंदकुमार जगेश्वर नेताम (वय ३७, रा. उत्तम टाऊन स्केप, प्रतीकनगर, येरवडा) असे जखमी झालेल्या मजुराचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मनीष अशोक साहू (वय १९) आणि मणीशंकर अशोक साहू (वय २१, दोघे रा. प्रतीकनगर, येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदकुमार नेताम आणि आरोपी साहू हे मूळचे छत्तीसगडमधील बमुरहड्डी गावातील रहिवासी असून, तिघेही बांधकाम मजूर आहेत. ८ फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास नेताम आणि त्याची पत्नी नियोजित गृहप्रकल्पातील लेबर कॅम्पकडे जात असताना आरोपी साहू तिथे थांबले होते. यावेळी आरोपी साहूंनी नेतामला ‘बिगारी कामगार नीट काम करत नाहीत’ असा टोमणा मारला. यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला, ज्याचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपी मनीष साहूने तीक्ष्ण शस्त्र आणून नेतामवर वार केले. नेतामच्या पत्नीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी तिलाही धक्काबुक्की केली. पत्नीने आरडाओरडा केल्याने नेतामच्या मेहुण्याने त्याला रुग्णालयात दाखल केले. घटनेनंतर पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अनिल पाडेकर या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, भवानी पेठेतील कासेवाडी परिसरातही वैमनस्यातून एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली. रोहन योगेश जाधव (वय २०) असे जखमी तरुणाचे नाव असून, अविनाश सुहास गायकवाड (वय १८) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून खडक पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलीस कर्मचारी योगेश कुंभार या प्रकरणाचा तपास करत आहेत.
किरकोळ वादातून बांधकाम मजुरावर खुनी हल्ला:विश्रांतवाडी पोलिसांनी दोघांना केली अटक
