![]()
कळमनुरी तालुक्यातील पोतरा शिवारात शिकार केलेल्या वासराचा बिबट्यांनी फडशा पाडल्याचे रविवारी ता. 14 सकाळी आढळून आले आहे. त्यामुळे आता या भागात पिंजऱ्यांची संख्या वाढविली जाणार असून अहिल्यानगर व परभणी येथून प्रत्येकी एक पिंजरा मागविण्यात आला आहे. या शिव
.
कळमनुरी तालुक्यातील पोतरा व तेलंगवाडी शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. तेलंगवाडी शिवारात काशीराम मोदे यांच्या शेतातील दोन शेळ्यांचा फडशा पाडल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी ता.13 बिबट्याने पोतरा शिवारातील गजानन पतंगे यांच्या शेतातील वासराची शिकार केली.
या घटनेनंतर विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे, सहाय्यक विभागीय वन अधिकारी सचिन माने, वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, वनपाल शिवाजी काळे, वनरक्षक सुधाकर कऱ्हाळे, खंडागळे, योगीता सहारे यांच्या पथकाने पाहणी करून पिंजरा लावण्याची तयारी केली होती. त्यानुसार शनिवारी ता. 13 रात्री पोतरा शिवारात एक पिंजरा लाऊन त्यात शेळी बांधली होती.
दरम्यान, आज सकाळी पाहणी केल्यानंतर पिंजऱ्यात बिबट्या आलाच नाही. तर पोतरा शिवारात पतंगे यांच्या शेतात वासराची शिकार केलेल्या ठिकाणी बिबट्या आला अन त्याने या शिकारीचा फडशा पाडल्याचे रविवारी ता. 14 सकाळी दिसून आले आहे. त्यामुळे आता वन विभाग अलर्ट मोडवर आले असून या परिसरात आणखी दोन पिंजरे लावण्याची तयारी चालवली आहे. त्यासाठी अहिल्यानगर व परभणी येथून प्रत्येकी एक पिंजरा मागविण्यात आला आहे. त्यानंतर आज या परिसरात तीन पिंजरे बसविले जाणार आहेत. या शिवाय ट्रॅप कॅमेऱ्यांची संख्याही 15 वरून 25 केली जाणार असल्याचे वन विभागाच्या सुत्रांनी सांगितले. सायंकाळपर्यंत दोन्ही ठिकाणचे पिंजरे पोतरा येथे येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या परिसरात वन विभागाचे तब्बल 25 पेक्षा अधिक कर्मचारी गस्तीसाठी तैनात करण्यात आले आहे.
बिबट्यांना जेरबंद करण्याचे प्रयत्न- मीनाक्षी पवार, वन परिक्षेत्र अधिकारी
या भागात एक मादी बिबट्या व दोन बछडे असल्याची शक्यता आहे. या बिबट्यांना जेरबंद करण्याचे वन विभागाचे प्रयत्न असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शेतकऱ्यांशी चर्चा करून आवश्यक त्या ठिकाणी पिंजरे लावले जात आहेत.
शेतकऱ्यांसह गावकऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक
या भागात एक बिबट्या व दोन बछडे शेतकऱ्यांच्या नजरेस पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह गावकऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. शेतात एकट्याने जाऊ नये तसेच शेतात जाणे आवश्यक असल्यास गटाने जावे तसेच जातांना मोबाईलवर गाणे ऐकत किंवा एकमेकांशी बोलत जावे. त्यामुळे बिबट्या जवळ येणार नाही.
