![]()
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांचे छोटे बंधू संदीप उर्फ अप्पा राऊतही यंदा मुंबई महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यांनी आपले मोठे बंधू आमदार सुनील राऊत यांच्या मतदारसंघातील विक्रोळीतील एका वॉर्डातून आपले
.
मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीतील पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. अनेक ठिकाणी या आघाड्यांमधील घटकपक्ष एकमेकांविरोधात उभे राहिले आहेत. यामुळे निवडणुकीत रंगत आली असताना संजय राऊत यांचे छोटे बंधू संदीप राऊत बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळाली आहे.
विक्रोळीतील वॉर्डातून निवडणूक लढवणार
यासंबंधीच्या माहितीनुसार, संदीप राऊत हे आपले बंधू आमदार सुनील राऊत यांच्या विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील 111 नंबरच्या वॉर्डातून निवडणूक लढवण्याच्या विचारात आहेत. पण ते ज्या वॉर्डासाठी इच्छुक आहेत, तिथे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने दावा केला आहे. यामुळे पेच निर्माण झाला आहे. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी शुक्रवारीच या प्रकरणी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची चर्चा कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे शरद पवार गट या जागेवरून माघार घेणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
वॉर्ड क्रमांक 111 मध्ये शरद पवार गटाचे धनंजय पिसाळ इच्छुक
विक्रोळीतील वॉर्ड क्रमांक 111 मध्ये ठाकरे व शरद पवार गटात वाद सुरू आहे. या वॉर्डातून यापूर्वी राष्ट्रवादीचे धनंजय पिसाळ निवडून आले होते. त्यामुळे ही जागा आपल्याकडेच राहावी अशी शरद पवार गटाची इच्छा आहे. पण ठाकरे गट या प्रकरणी संदीप राऊत यांच्यासाठी जोर लावत आहे. मुंबई निवडणुकीत या दोन्ही पक्षांची युती झाली नाही, तर या जागेवरून संदीप राऊत हे ठाकरे गटाचे उमेदवार असतील हे जवळपास फायनल झाले आहे.
शरद पवार गटाशी सकारात्मक चर्चा – राऊत
दुसरीकडे, संजय राऊत यांनी मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा केला आहे. आमची शरद पवारांच्या पक्षाशी सकारात्मक चर्चा झाली. त्यांना ज्या जागा हव्या होत्या, त्यातील बहुतेक जागा त्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आमच्या आघाडीत सध्या तरी काही अडचण दिसत नाही. आम्ही त्यांचे समाधान केले आहे. शरद पवारांचा पक्ष आमच्यासोबत असावा अशी आमची इच्छा आहे. त्यामुळेच आम्ही त्यांना आमच्या वाट्याच्या जागा दिल्या आहेत. आमचे नुकसान झाले, पण ठीक आहे. आमचे लोक नाराज झालेत. पण युतीमध्ये हे सर्वकाही चालते.
यावेळी पत्रकारांनी संजय राऊत यांना संदीप राऊत यांच्या उमेदवारीविषयी विचारणा केली. त्यावर संजय राऊत यांनी आपल्याला याची कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले. संदीप राऊत यांच्याविषयी मला काहीही माहिती नाही, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामु्ळे संदीप राऊत निवडणूक लढवणार किंवा नाही याविषयी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
