'पेपरफुटी'ची तुलना थेट 'आंबा चोरी'शी!:चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त विधान, हर्षवर्धन सपकाळ, अमित ठाकरेंचा संताप; नेमके काय म्हणाले?




महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘पेपरफुटी’ची तुलना थेट ‘आंबा चोरी’शी केल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली असून, त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या धक्कादायक वक्तव्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांच्यासह सर्वच विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या विधानावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, चंद्रकांत पाटील साहेब, आंबा चोरीला गेला तर दुसरा विकत घेता येतो… पण पेपरफुटीमुळे उद्ध्वस्त झालेलं विद्यार्थ्याचं भविष्य कुठल्या बाजारात मिळतं? आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांना नवीन लेकरू कुठल्या बाजारात मिळणार? 152 पेपरफुटी, कोट्यवधी विद्यार्थी त्रस्त झाले आहेत… आणि तरीही हा विषय तुम्हाला “आंबा चोरी”एवढा किरकोळ वाटतो? विद्यार्थ्यांच्या भविष्याची अशी थट्टा करणाऱ्या व्यक्तीकडे राज्याचं उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय असणं, हीच महाराष्ट्राची सर्वात मोठी शोकांतिका आहे, अशा शब्दात सपकाळ यांनी टीका केली आहे. चंद्रकांत पाटलांच्या विधानावर बोलताना मनसे नेते अमित ठाकरे म्हणाले, तिथे 20 मुला-मुलींनी आत्महत्या केली आहे. तुम्ही त्याची तुलना आंबे चोरी करण्याशी करताय. म्हणजे आता ते काय बोलत आहेत, हे पण त्यांना कळत नाहीये. हे कुठेतरी भरकटले आहेत. भाजपच्या अनेक प्रवक्त्यांचे मी व्हिडीओ पाहिले, आधी ते किंचाळायचे, पण आता देश पेटलाय हे त्यांनाही कळलं आहे, असे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे. काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील? चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, “एखादा पेपर फुटल्यानंतर.. म्हणजे एखाद्याने एक आंबा चोरला, तर त्याची शिक्षा फाशी नसते ना? आंबा चोरला, तर समज देणं असतं. आणखी काही चोरलं, त्याची शिक्षा ठरली असते. प्रत्येक गोष्टीला.. फाशी फाशी असं नसतं ना, असे विधान पाटील यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *