नागद येथील आरोग्य शिबिरामध्ये 1220 रुग्णांवर केले मोफत उपचार:रक्तदान शिबिरासही प्रतिसाद




कोरोना काळाने मानवी आयुष्याचे आणि आरोग्याचे खरे मूल्य सर्वांना पटवून दिले आहे. या पार्श्वभूमीवर समाजात सामाजिक दातृत्वाची भावना जपून रक्तदान हेच श्रेष्ठदान मानत तरुणांनी मोठ्या संख्येने रक्तदान करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांनी केले. नागद येथे महाआरोग्य व रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान, या शिबिरात १२२० रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. भाजप वैद्यकीय समितीचे जिल्हा सचिव डॉ. दिलीपसिंग राजपूत आणि जिल्हा परिषद सदस्या डॉ. तृप्ती राजपूत यांच्या पुढाकाराने हे शिबिर पार पडले. मुख्यमंत्री सचिवालय मदत कक्ष, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना खंबायते म्हणाले, नागद हा परिसर दुर्गम व डोंगरी आहे. उपचारासाठी नागरिकांना सव्वाशे किलोमीटरचा टप्पा पार करून संभाजीनगरला जावे लागते. हाच त्रास वाचवण्यासाठी ‘वैद्यकीय सेवा आपल्या दारी’ आणण्याचा डॉ. राजपूत यांचा प्रयत्न स्तुत्य आहे. प्रास्ताविक करताना जि. प. सदस्या डॉ. तृप्ती राजपूत म्हणाल्या की, नागद, बनोटी व पांगरा परिसरातील शेतकरी आणि कष्टकरी बांधव आजार अंगावर काढतात. विशेषतः महिला आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. आजारांवर निदान होण्यासाठी ग्रामीण भागात आरोग्य साक्षरता आणि जागृती वाढणे आवश्यक आहे. लोकमान्य ब्लड बँकच्या सहकार्याने घेतलेल्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *