NEET आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडक निर्बंध:6 ऑगस्टपर्यंत जमावबंदी, परवानगीशिवाय आंदोलन केल्यास गुन्हा




नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभर सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी संपूर्ण शहरात 24 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हे आदेश जारी करण्यात आले असून, पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना बेकायदेशीरपणे एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. परवानगीशिवाय आंदोलन किंवा मोर्चा काढल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. मुंबई पोलिसांनी मंगळवारी जारी केलेल्या आदेशानुसार, विविध गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरात शांतता भंग होण्याची, सार्वजनिक सुव्यवस्था बिघडण्याची तसेच जीवित आणि मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम 37 अंतर्गत संपूर्ण मुंबईत हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. संवेदनशील भागात कडेकोट बंदोबस्त दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत अलीकडे विविध ठिकाणी आंदोलने झाली होती. या पार्श्वभूमीवर शहरातील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर जमाव, मोर्चे किंवा आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. काय-काय राहणार बंद? प्रतिबंधात्मक आदेशानुसार शस्त्रे, स्फोटके किंवा धोकादायक वस्तू बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी करणे, गाणी वाजवणे, भाषणे देणे, पुतळे किंवा प्रतिकात्मक वस्तूंचे प्रदर्शन करणे, फलक, बॅनर, चिन्हे किंवा अन्य साहित्याचे प्रदर्शन करण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. सार्वजनिक शांतता, राज्याची सुरक्षा किंवा नैतिकतेला बाधा पोहोचेल असे कोणतेही कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. परवानगीशिवाय आंदोलन केल्यास गुन्हा मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, आवश्यक परवानगी न घेता आंदोलन किंवा मोर्चा काढल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 223, महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 135 तसेच बेकायदेशीर जमावासंदर्भातील भारतीय न्याय संहितेतील कलम 189 आणि 190 अंतर्गत गुन्हे दाखल केले जाऊ शकतात. आधीच 900 जणांवर गुन्हे दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत झालेल्या निदर्शनांनंतर मुंबई पोलिसांनी जवळपास 900 आंदोलकांविरुद्ध आठ एफआयआर नोंदवले आहेत. त्यानंतर शहरात पुन्हा मोठ्या प्रमाणावर आंदोलन होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. आंदोलनाची पार्श्वभूमी 20 जुलै रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर हजारो विद्यार्थी आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते एकत्र आले होते. नीट-यूजी पेपरफुटीसह परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारांवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत संसदेकडे मोर्चा काढण्यात आला होता. या आंदोलनाचे पडसाद देशभर उमटले असून मुंबईसह अनेक शहरांत निदर्शने झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवरच मुंबई पोलिसांनी 6 ऑगस्टपर्यंत शहरभर प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. हेही वाचा… वंचित बहुजन आघाडीचा आज ‘महाराष्ट्र बंद’:कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटिसा, जबरदस्ती केल्यास कारवाईचा इशारा नवी दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राज्यभरात, विशेषतः मुंबईत पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंददरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच जबरदस्तीने दुकाने किंवा व्यवहार बंद पाडले जाऊ नयेत, यासाठी पोलिसांनी ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत. शांतता भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. सविस्तर वाचा जंतर-मंतरवर पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष:CJP समर्थकांनी दगडफेक केली, ACP जखमी; पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे फेकले; 16 मेट्रो स्टेशन बंद दिल्लीतील जंतर-मंतरजवळ बुधवारी रात्री 8:30 च्या सुमारास विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, कनॉट प्लेस येथील टॉल्स्टॉय मार्गाजवळ काही उपद्रवींनी पोलिसांवर दगड आणि बाटल्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एसीपी कनॉट प्लेस विवेक भगत जखमी झाले. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे फेकले. घटनेशी संबंधित काही व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले. ज्यात आंदोलकांच्या हातात लाठ्याही दिसत आहेत. ते पोलिसांवर हल्ला करत आहेत. ही झटापट सुमारे 15 मिनिटे चालली. त्यानंतर परिस्थिती सामान्य आहे. सविस्तर वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *