![]()
नवी दिल्लीतील जंतरमंतरवर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भक्कम पाठिंबा दिला आहे. देशात लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनांना दडपशाहीने चिरडण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत, अण्णा हजारे आज अहिल्यानगरमध्ये एक दिवसीय ‘मौन धरणे’ आंदोलन करणार आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र पाठवले असून, ‘आंदोलकांचा आवाज दडपण्याऐवजी त्यांच्याशी सकारात्मक संवाद साधावा आणि पेपरफुटीसारख्या गंभीर प्रकरणांमध्ये वरिष्ठ नेतृत्वाने आपली जबाबदारी स्वीकारावी,’ असे खडेबोल सुनावले आहेत. अहिल्यानगरात उभारले ‘नगरचे जंतरमंतर’ दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाशी एकरूपता दर्शवण्यासाठी अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत आज अहिल्यानगर येथे मौन धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे आंदोलन आज, सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत अहिल्यानगर येथील वाडिया पार्क जवळील गांधी स्मारक येथे पार पडणार आहे. प्रतीकात्मक नाव दिल्लीतील दडपशाहीचा निषेध नोंदवण्यासाठी या आंदोलनस्थळाला प्रतीकात्मक स्वरूपात ‘नगरचे जंतरमंतर’ असे नाव देण्यात आले आहे. प्रश्नांची सोडवणूक ही संघर्षातून नव्हे, तर संवादातूनच व्हायला हवी, हा या मौन आंदोलनामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. संवादातून तोडगा काढावा, आवाज दाबू नका : अण्णा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे. आंदोलनकर्त्यांचा आवाज दडपण्याऐवजी त्यांच्याशी सकारात्मक संवाद साधून प्रश्न सोडवण्याचा मार्ग स्वीकारावा, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे. लोकशाहीत हिंसा, सार्वजनिक मालमत्तेची हानी आणि अनावश्यक बळाचा वापर कुणाच्याही हिताचा नसल्याचेही त्यांनी नमूद केले. पत्रात अण्णा हजारे यांनी देशातील लाखो तरुणांमध्ये पेपरफुटी, भरती प्रक्रियेत होणारा विलंब, वाढती बेरोजगारी आणि प्रशासनातील अनियमितता यामुळे तीव्र असंतोष निर्माण झाल्याचे म्हटले आहे. या प्रश्नांकडे केवळ कायदा-सुव्यवस्थेचा विषय म्हणून न पाहता समाजाच्या वेदना आणि अपेक्षांच्या दृष्टीने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. हेही वाचा.. वंचित बहुजन आघाडीचा आज ‘महाराष्ट्र बंद’:कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटिसा, जबरदस्ती केल्यास कारवाईचा इशारा नवी दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राज्यभरात, विशेषतः मुंबईत पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंददरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच जबरदस्तीने दुकाने किंवा व्यवहार बंद पाडले जाऊ नयेत, यासाठी पोलिसांनी ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत. शांतता भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. सविस्तर वाचा जंतर-मंतरवर पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष:CJP समर्थकांनी दगडफेक केली, ACP जखमी; पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे फेकले; 16 मेट्रो स्टेशन बंद दिल्लीतील जंतर-मंतरजवळ बुधवारी रात्री 8:30 च्या सुमारास विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, कनॉट प्लेस येथील टॉल्स्टॉय मार्गाजवळ काही उपद्रवींनी पोलिसांवर दगड आणि बाटल्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एसीपी कनॉट प्लेस विवेक भगत जखमी झाले. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे फेकले. घटनेशी संबंधित काही व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले. ज्यात आंदोलकांच्या हातात लाठ्याही दिसत आहेत. ते पोलिसांवर हल्ला करत आहेत. ही झटापट सुमारे 15 मिनिटे चालली. त्यानंतर परिस्थिती सामान्य आहे. सविस्तर वाचा
दिल्लीतील विद्यार्थ्यांसाठी अण्णा हजारे मैदानात:अहिल्यानगरात आज मौन धरणे आंदोलन; पंतप्रधान मोदींना पाठवले पत्र
