मशाल दिसली तर असलेला निधीही कापून टाकतो:'कमळ आणि धनुष्यबाणा'साठीच तिजोरी उघडणार, भर प्रचारसभेत नीतेश राणेंचे वक्तव्य




राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला आहे. अशातच भाजप नेते आणि मंत्री नीतेश राणे यांनी प्रचार सभेत केलेल्या एका विधानामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. “जिथे कमळ किंवा धनुष्यबाण हे चिन्ह दिसेल तिथे आम्ही भरभरून निधी देऊ, पण जिथे मशाल चिन्ह दिसेल तिथला असलेला निधीही आम्ही कमी करू,” असे खळबळजनक वक्तव्य नीतेश राणे यांनी केले आहे. कणकवलीतील फोंडा जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मामा हळदिवे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. नीतेश राणे यांनी आपल्या भाषणात अत्यंत आक्रमक पवित्रा घेत मतदारांना आणि विरोधकांना थेट इशारा दिला. “निधी देताना आम्ही चिन्ह बघणार. कमळ आणि धनुष्यबाण ही आमची अधिकृत चिन्हं आहेत. त्यामुळे या चिन्हांच्या उमेदवारांनाच विकासाचा वाटा मिळेल. चुकून कुठे मशाल चिन्ह निघालं, तर तिथला निधी देणं तर लांबच, उलट असलेला निधीही आम्ही कमी करून टाकतो,” असे नीतेश राणे म्हणालेत. ग्रामपंचायत निवडणुकांचा दिला दाखला निधी वाटपाबाबत विधान करताना नीतेश राणे यांनी त्यांच्या पूर्वीच्या ग्रामपंचायत निवडणुकीतील वक्तव्या दाखला दिला. “ग्रामपंचायत निवडणुकीतही मी सरपंचांना स्पष्ट सांगितले होते. आमच्या बाजूने उभे राहा, नाहीतर एक रुपयाचाही निधी मिळणार नाही. त्याचा परिणाम म्हणून सगळे सरपंच पटापट आमच्याकडे आले,” असा दावा नीतेश राणे यांनी यावेळी केला. जिल्ह्याचा विकास आम्हीच करू शकतो जिल्ह्याचा विकास केवळ राणे कुटुंब आणि महायुतीच करू शकते, असा विश्वास व्यक्त करताना नीतेश राणे म्हणाले की, गेली २७ वर्षे जिल्हा परिषद खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली आहे. “प्रतिस्पर्धी उमेदवारांना मतदान करायला लोकांकडे कोणतेही कारण नाही. जिल्ह्याच्या विकासाचा वारसा पुढील पाच वर्षेही आमच्याच हातात राहील,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले. ठाकरे गटावर बोचरी टीका शिवसेना ठाकरे गट म्हणजेच ‘उबाठा’ची आपल्याला कोणतीही काळजी नसल्याचे सांगत राणेंनी टोला लगावला. “त्यांचे जे काही थोडे-थोडके उमेदवार उरले आहेत, ते प्रचारात कुठे दिसतही नाहीत. काही तर लपत फिरत आहेत. शेवटी निवडणुकीनंतर त्यांनाही निधीसाठी आमच्याकडेच यावे लागणार आहे,” असे ते म्हणाले. फोंड्यासाठी एक कोटी निधीची घोषणा फोंडा मतदारसंघातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी नीतेश राणे यांनी मोठी घोषणा केली. “मामा हळदिवे यांना या मतदारसंघातून नंबर वनची लीड मिळवून द्या, पहिल्याच टप्प्यात एक कोटी रुपयांचा विकास निधी या मतदारसंघासाठी मंजूर करतो,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *