![]()
तालुक्यातील कासोदा येथे श्री महादेव मंदिर, गरीब नवा चौक परिसरात आमदार ॲड. अमोल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा भव्य प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी आमदार पाटील यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मुस्लिम बांधवांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. नव्याने पक्षात दाखल झालेल्या सर्वांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. जात, धर्म आणि पंथाच्या पलीकडे जाऊन सर्व समाजघटकांना समान न्याय, विकास आणि सन्मान मिळावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. असे प्रतिपादन यावेळी आमदार ॲड. पाटील यांनी केले. या कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख तथा गटनेते नगरसेवक प्रा. मनोज पाटील, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुदाम राक्षे, तालुकाप्रमुख रवींद्र जाधव, अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख अहमद सय्यद, पंचायत समितीचे माजी सभापती गबाजी पाटील, जिल्हा दूध संघाचे संचालक दगडू चौधरी, अल्पसंख्यांक उपजिल्हाप्रमुख जावेद मुजावर, कासोद्याचे माजी सरपंच महेश पांडे, सरपंच बंटी चौधरी, माजी तालुकाप्रमुख बबलू पाटील यांच्यासह शिवसेना-युवासेनेचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, शिवसैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार ॲड. अमोल पाटील म्हणाले, “शिवसेना ही सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या हक्कासाठी सातत्याने लढणारी संघटना आहे. कासोद्यात झालेला उत्स्फूर्त पक्षप्रवेश हा विकासाच्या राजकारणावर जनतेने व्यक्त केलेला विश्वास आहे. मतदारसंघात झालेली विकासकामे ही जनतेच्या विश्वासाची खरी पावती असून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य सन्मान व जबाबदारी देत जनसेवेचे कार्य अधिक वेगाने पुढे नेले जाईल.
सर्व घटकांना न्याय, विकास, सन्मानासाठी कटिबद्ध:कासोद्यात शिवसेनेच्या प्रवेश सोहळ्यात आमदार ॲड. अमोल पाटील यांचे प्रतिपादन
