सोनम वांगचुक यांना समर्थन:नीटचे पडसाद; तरूणाई, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना रस्त्यावर




नीट पेपर फुटीवरुन दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाचे सोमवारी अकोल्यात पडसाद उमटले. तरुणाईसह राजकीय पक्ष, शैक्षणिक, सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या. नीट पेपर फुटीसह, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल करा, अशा मागण्या आंदोलकांनी लावून धरल्या. याच अनुषंगाने लडाखचे पर्यावरणवादी व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे करत असलेल्या आंदोलनाला तरुणाईने पाठिंबा देत केंद्र सरकारच्या धोरणांवर टीकास्त्र डागले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर सोमवारी सकाळपासूनच आंदोलकांनी भरून केला. रस्त्याच्या कडेला मंडप टाकत तरुणांनी नीट पेपरीफुटीसह अन्य शैक्षणिक मुद्द्यांवर केंद्र सरकारने टीकास्त्र डागत आपला संताप व्यक्त केला. शिक्षण बचाव कृती समिती, भाकप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह युवकांनी आंंदोलनात सहभाग नोंदवला. नीटपेपरफुटी, परीक्षा व्यवस्थेतील अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी झालेल्या खेळाबद्दल तरुणाईने तीव्र संताप व्यक्त केला. सोनम वांगचुक यांच्या शांततापूर्ण आंदोलनाकडे केंद्र सरकारने केलेले दुर्लक्ष लोकशाहीला शोभणारे नाही, अशी टीका आंदोलनादरम्यान करण्यात आली. आंदोलकांची मागणी पूर्ण करावी असे यावेळी सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नका. नीटसारख्या परीक्षांचे पेपर फुटत असल्यामुळे निष्पाप विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागली. ज्या पालकांनी कर्ज काढून, रक्ताचे पाणी करून आपल्या मुलांना शिकवले, त्यांच्या पदरात शेवटी काय पडले? शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशा तीव्र शब्दांत आंदोलक विद्यार्थिनी विशाखा खंडेराव हिने संताप व्यक्त केला. राकाँ शरद पवार पक्ष : नीटसह अन्य पेपरफुटी, भरती घोटाळे व ऑनलाइन परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींविरोधात राकाँ शरदचंद्र पवार पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यायासमोर आंदोलन केले. सरकार विरोधात घोषणा दिल्या. शिक्षण बचाव कृती समिती : पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे म्हणत समितीने आक्रमक पवित्रा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयामोर ठिय्या देत तरुणाईने केंद्र सरकार विरोधात टीकास्त्र डागले. भाकप : वांगचुक यांच्या समर्थनार्थ आणि शिक्षण मंत्री प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करीत भाकपने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आंदोलनात सर्वाधिक महिला सहभागी झाल्या. राष्ट्रीय चर्मकार महासंघ : नीट पेपर लीक प्रकरणी महासंघाच्या नेतृत्वात चर्मकार समाजातील विविध संघटनांतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. महायुतीला घेरण्याचा प्रयत्न गत काही दिवसांपासून केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या योजनांचा गाजावाजा महायुती- एनडीएतील घटक पक्ष करत आहेत. या केंद्रीय विद्यालय, विमानतळ विस्तारीकरण, रस्ते-पुलांसाठी निधी, शेतकरी कर्जमुक्ती योजनांचा समावेश आहे. मात्र आता नीट व सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्यानिमित्तान े विरोधकांना सत्ताधाऱ्यांना घेरण्याची संधी मिळाली आहे. यात डावे पक्ष, काँग्रेसचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा समावेश आहे. मात्र राकाँ शरद पवार गट हा महापालिकेत भाजपच्या नेतृत्वातील शहर सुधार समितीच्या सत्तेत सहभागी आहे. त्यामुळे आगामी काळात केंद्र-राज्य सरकारच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेचे पडसाद स्थानिक सोयीच्या आघाडीवर पडतात काय, हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *