इन्स्टाग्रामवरील जातीय शिवीगाळ प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा; तरुणाने न्यायासाठी ठोठावले पोलिस ठाण्याचे उंबरठे 


नांदेड (प्रतिनिधी)-  सोशल मीडियाचा वापर संवादासाठी होत असताना त्याच माध्यमातून जातीय द्वेष पसरविण्याचे प्रकार वाढत असल्याची चिंताजनक बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. नांदेड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरातील एका २८ वर्षीय तरुणाने इन्स्टाग्रामवर जातिवाचक शिवीगाळ करून मानसिक छळ केल्याची तक्रार दिल्यानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा शिक्षण घेत असून ९ जुलै रोजी रात्री इन्स्टाग्रामवरील एका लाईव्ह व्हिडिओदरम्यान संशयितांनी त्याच्यासह त्याच्या समाजाविषयी अत्यंत आक्षेपार्ह, जातिवाचक आणि अश्लील वक्तव्ये केली. या अपमानास्पद शब्दांमुळे फिर्यादीच्या भावना दुखावल्या गेल्या असून त्याला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेचे स्क्रीन रेकॉर्डिंग फिर्यादीच्या मित्राने करून त्याच्याकडे पाठविले. त्यानंतर संबंधित व्हिडिओ पाहिल्यानंतर धक्का बसलेल्या तरुणाने पोलिसांकडे धाव घेत न्यायाची मागणी केली. सोशल मीडियावरील एका लाईव्ह प्रसारणातून केलेले कथित वक्तव्य एका व्यक्तीच्या स्वाभिमानावरच नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या भावना दुखावणारे असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी योगेश कल्याणकर आणि रूपेश बोबले या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) मधील संबंधित कलमे, माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६७ तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत कलम ३(१)(र) व ३(१)(स) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सोशल मीडियावर द्वेषपूर्ण, जातीय किंवा आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

ही घटना केवळ एका तरुणाची वेदना नसून, समाजातील परस्पर सन्मान, बंधुता आणि संविधानाने दिलेल्या समानतेच्या मूल्यांवर आघात करणारी असल्याची भावना व्यक्त होत आहे. सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करणे आणि कोणाच्याही जाती, धर्म किंवा व्यक्तिमत्त्वाचा अपमान टाळणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचेही या घटनेतून अधोरेखित झाले आहे.


Post Views: 4






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *