नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात बनावट व निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी कृषी विभागाच्या तक्रारीवरून सोनखेड, बिलोली आणि किनवट पोलीस ठाण्यांत चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बीजगुणवत्ता तपासणीत संबंधित बियाण्यांची उगवण क्षमता कंपनीने केलेल्या दाव्याप्रमाणे नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
सोनखेड येथे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. पहिल्या प्रकरणात उत्पादक विद्यम सोया प्रोसेसिंग प्लांट प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, वाशीम आणि एस.के.बी. सिड्स प्रा. लि., इंदूर यांनी सोयाबीन ‘आविष्कार दुर्गा’ या वाणाची 70 टक्के उगवण क्षमता असल्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात बियाणे अप्रमाणित आढळल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या प्रकरणात एशियन सिड्स प्रा. लि., इंदूर निर्मित ‘कृषी गोल्ड 151’ या सोयाबीन वाणाबाबतही 70 टक्के उगवण क्षमतेचा दावा करण्यात आला होता. तपासणीत हा दावा चुकीचा आढळल्याने संबंधित उत्पादक व वितरकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
बिलोली येथे पार्थ जेनेटिक्स इंडिया एलएलपी, झाबुआ (मध्य प्रदेश) या कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांबाबतही अशाच प्रकारची फसवणूक उघडकीस आली. कृषी विभागाच्या तक्रारीनंतर बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.
किनवट येथे द्वारसी अॅग्रो प्रा. लि., रेणुकी रोड, सेलू या कंपनीविरुद्धही निकृष्ट दर्जाचे सोयाबीन बियाणे विकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित कंपनीने 70 टक्के उगवण क्षमतेचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात बियाणे अप्रमाणित असल्याचे आढळल्याने शेतकऱ्यांची दिशाभूल झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या सर्व प्रकरणांमध्ये कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बीजगुणवत्ता (बीज) कायदा-2023, अत्यावश्यक वस्तू अधिनियम तसेच संबंधित नियमांनुसार गुन्हे नोंदविण्यात आले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. जिल्ह्यात बनावट व निकृष्ट बियाण्यांविरुद्ध कृषी विभागाने सुरू केलेल्या कारवाईमुळे बियाणे विक्रेते आणि उत्पादकांमध्ये खळबळ उडाली आहे.
Post Views: 80
