![]()
मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) अतिवृष्टी, पूरस्थिती आणि पायाभूत सुविधांबाबत विधानसभेत नियम 293 अंतर्गत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाची आकडेवारी मांडत सरकारच्या उपाययोजनांचा तपशील दिला. यावेळी त्यांनी मुंबईत केवळ सहा दिवसांत संपूर्ण जुलै महिन्याच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे सांगितले. तसेच मुंबईची तुंबई रोखण्यासाठी 13 हजार कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती दिली. याचवेळी त्यांनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (अटल सेतू) आणि कनेक्टिंग लिंक प्रकल्पावरून विरोधकांच्या टीकेलाही जोरदार प्रत्युत्तर दिले. आघाडी सरकारने हा प्रकल्प अशक्य असल्याचे सांगून फाइल बंद केली होती, मात्र महायुती सरकारने हिंमत दाखवत तो पूर्ण केल्याचा दावा त्यांनी केला. नियम 293 अंतर्गत मुंबईच्या प्रश्नांवर चर्चा मुख्यमंत्री म्हणाले की, नियम 293 अंतर्गत झालेल्या चर्चेत एकूण 19 सदस्यांनी सहभाग घेतला. चर्चेची सुरुवात अमित साटम यांनी केली. त्यानंतर जयंत पाटील, सुनील प्रभू, मुरजी पटेल, अमिन पटेल, सना मलिक, अतुल भातखळकर, मनीषा चौधरी, चेतन तुपे, अबू आझमी यांच्यासह अनेक सदस्यांनी मुंबई आणि एमएमआरमधील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मते मांडली. सहा दिवसांत जुलैच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, साधारणपणे जुलै महिन्यात कुलाबा येथे 734 मिमी आणि सांताक्रूझ येथे 856 मिमी पाऊस पडतो. मात्र यंदा केवळ सहा दिवसांत कुलाबा येथे 882 मिमी आणि सांताक्रूझ येथे 988 मिमी पाऊस नोंदवला गेला. त्यामुळे कुलाब्यात जुलैच्या सरासरीच्या 111 टक्के, तर सांताक्रूझमध्ये 102 टक्के पाऊस केवळ सहा दिवसांत झाला. चार दिवसांचा विचार केला तरी जवळपास 90 टक्के पाऊस या कालावधीत पडल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस म्हणाले की, मुंबईत संपूर्ण पावसाळ्यात जितका पाऊस पडतो, त्यापैकी तब्बल 41 ते 42 टक्के पाऊस केवळ सहा दिवसांत झाला. हा पाऊस दिल्लीच्या संपूर्ण पावसाळ्यातील पावसाच्या 117 टक्के, पुण्याच्या 113 टक्के आणि बंगळुरूच्या संपूर्ण हंगामातील 96 टक्क्यांच्या बरोबरीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुसळधार पाऊस, वेगवान वारे आणि चार मीटरची भरती मुख्यमंत्री म्हणाले की, या काळात केवळ मुसळधार पाऊसच नव्हता, तर 50 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत होते. त्याचवेळी चार मीटरपर्यंतची भरती होती. या तिन्ही गोष्टी एकाचवेळी घडल्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आणि विविध दुर्घटना घडल्या. या दुर्घटनांमध्ये नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला. झाडे आणि धोकादायक इमारतींबाबत महापालिकेला निर्देश मुंबईतील वारंवार होणाऱ्या दुर्घटनांचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, जुन्या झाडांची मुळे कमकुवत झालेली आहेत. त्यामुळे त्यांचे पुनरुज्जीवन कसे करता येईल याबाबत मुंबई महापालिकेला निर्देश देण्यात आले आहेत. धोकादायक इमारतींचाही त्यांनी उल्लेख केला. एका इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढण्यात आले होते. मात्र शेजारच्या घरातील काही लोकांनी स्थलांतरास नकार दिला आणि दुर्दैवाने त्यांच्यावरच इमारत कोसळल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईच्या तुंबईवर 13 हजार कोटींचा आराखडा फडणवीस यांनी सांगितले की, ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाची अनेक वर्षे चर्चा झाली, पण तो पूर्ण होऊ शकला नाही. आता त्यातील प्रमुख कामे पुढील एक-दोन वर्षांत पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासोबतच मुंबईसाठी 13 हजार कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार करण्यात आला असून तो केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. या आराखड्याअंतर्गत मुंबईतील सुमारे 370 पूरग्रस्त हॉटस्पॉट दूर करण्याचे उद्दिष्ट आहे. भरतीमुळे पावसाचे पाणी समुद्रात जाण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अशा ठिकाणी 30 मिनिटांत पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था या योजनेत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘महायुतीत हिंमत होती म्हणून कनेक्टिंग लिंक बांधली’ अटल सेतूच्या कनेक्टिंग लिंकवरून होत असलेल्या टीकेलाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. काही जण टीव्हीवर येऊन चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप करत त्यांनी, “महायुती सरकारमध्ये हिंमत होती म्हणून आम्ही कनेक्टिंग लिंक बांधली,” असे ठामपणे सांगितले. आघाडी सरकारने फाइल बंद केली होती फडणवीस यांनी सांगितले की, मागील आघाडी सरकारच्या काळात या मिसिंग लिंकचा प्रस्ताव तयार झाला होता. मात्र तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी 14 कारणे देत हा प्रकल्प शक्य नसल्याचे सांगून फाइल बंद केली होती. त्याउलट महायुती सरकारने तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि तो प्रत्यक्षात साकारला, असे त्यांनी सांगितले. ‘गिरते हैं शहसवार…’ म्हणत फडणवीसांची शायरी कनेक्टिंग लिंक प्रकल्पाचा उल्लेख करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेरो-शायरीही सादर केली. “गिरते हैं शहसवार ही मैदान-ए-जंग में, तिफ्ल क्या गिरे जो घुटनों के बल चले.” ते म्हणाले, “आम्ही निर्णय घेतला, तज्ज्ञांशी चर्चा केली आणि तो करून दाखवला. ही केवळ लिंक नाही, तर अभियांत्रिकीचा चमत्कार आहे.” त्यांनी सांगितले की, या प्रकल्पात जगातील सर्वात रुंद बोगदा, भारतातील सर्वात उंच केबल-स्टेड पूल आणि 170 किलोमीटर प्रतितास वेगाच्या वाऱ्यांनाही तोंड देणारी रचना उभारण्यात आली आहे. हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यावरही टोला मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. “काही लोक म्हणतात, आमच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये पाऊस पडणार असल्याचे सांगितले. अशा प्रकारची विधाने करणाऱ्यांना काय बोलावे, हेच कळत नाही,” असा टोला त्यांनी लगावला. मुंबईतील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावर भर आपल्या उत्तराच्या शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक संकटांना पूर्णपणे रोखता येत नसले, तरी त्यांचे परिणाम कमी करण्यासाठी सरकार सर्वंकष नियोजन करत असल्याचे सांगितले. पूर नियंत्रण, धोकादायक इमारती, झाडांचे व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाच्या माध्यमातून मुंबईकरांना दरवर्षीच्या पावसाळी समस्यांपासून मोठ्या प्रमाणात दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही बातमी अपडेट होत आहे…
विधानसभेत मुख्यमंत्र्यांचे सविस्तर उत्तर:पूरमुक्तीसाठी 13 हजार कोटींचा आराखडा, कनेक्टिंग लिंकवरून टीकेवर म्हणाले- एखाद कोटी खोटारडे लोक मेल्यानंतर ते पैदा झाले!
