गांधी सप्ताहाचे गांधी भवनमध्ये उद्घाटन:गांधींवरचा शेंदूर खरडून बाजूला काढल्यास नव्या पिढीला गांधी समजतील, ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांचे मत

महाराष्ट्र




महात्मा गांधी यांनी देशाला चेतना देत अद्भुत लोकशक्ती उभी केली. मात्र, गांधींना नव्या पिढीसमोर नेणे हे आजचे मोठे आव्हान आहे. ‘जेन-झी’ पिढीला गांधी समजावून सांगायचे असतील, तर गांधीभक्तांनी गांधींवर चढवलेला शेंदूर खरडून बाजूला काढावा लागेल. गांधी म्हणजे केवळ सत्य आणि अहिंसा एवढ्यापुरते त्यांचे विचार मर्यादित नाहीत. सत्य, अहिंसा आणि त्यांच्या अन्य मूल्यांचा व्यापक अर्थ नव्या पिढीला समजून सांगण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार व लेखक अंबरीश मिश्र यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने कोथरूड येथील गांधी भवनमध्ये ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाचे उद्घाटन अंबरीश मिश्र यांच्या ‘एक थेंब गांधी’ या व्याख्यानाने झाले. यावेळी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष व भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, विश्वस्त अन्वर राजन, लक्ष्मीकांत देशमुख, प्रवीण सप्तर्षी, ॲड. अभय छाजेड, डॉ. एम. एस. जाधव, रमेश आढाव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. मिश्र म्हणाले, गांधीवादी कार्यकर्त्यांविषयी माझ्या मनात मोठा आदर आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि डॉ. कुमार सप्तर्षी यांचे अतूट नाते होते. मुख्य प्रवाहाच्या विरोधातही गांधी भवन सातत्याने काम करत राहिले आहे. गांधी समजून घेणे अवघड आहे, कारण त्यांच्या तत्त्वज्ञानाचा आपण पुरेसा अभ्यास आणि अनुभव घेतलेला नाही. गांधी हा माझ्यासाठी ‘यमन रागा’सारखा आहे. त्यांना सोडूनही देता येत नाही आणि त्यांची पाठ सोडून पुढेही जाता येत नाही. गांधी हा केवळ अभ्यासाचा नव्हे, तर अनुभूतीचा विषय आहे. गांधी संन्यासी नव्हते. आयुष्यभर लोकांमध्ये राहून त्यांनी समाजाच्या अनेक पिढ्या घडवल्या. गांधींचे केवळ गुळगुळीत आणि सोयीचे रूप समाजासमोर मांडले गेले. त्यांना समजून घेण्यासाठी त्यांचे मूळ गुजराती साहित्य वाचणे आवश्यक आहे. लोकांचे गुण ओळखून त्यांना योग्य जबाबदारी देण्याची गांधींची पद्धत विलक्षण होती. सामान्य माणूस मनमोकळेपणाने त्यांच्याशी संवाद साधू शकत होता. आज समाजात नागरिक आणि प्रजा यांच्यातील संघर्ष जाणवतो. नागरिक नियम पाळतो; मात्र सत्ताधाऱ्यांकडून मनमानी होत असल्याची भावना निर्माण होते. जात आणि धर्माच्या आधारावर सामाजिक वातावरण तापत राहिल्याने अस्थिरता निर्माण होत आहे. समाजातील विषमतेचे परिणाम अखेर राज्यकर्त्यांनाही भोगावे लागतात, असे मिश्र यांनी सांगितले. गांधींचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवताना पारंपरिक चौकटींपेक्षा त्यांच्या विचारांचा गाभा समजावून सांगणे महत्त्वाचे आहे. जेन-झी पिढी पारंपरिक पद्धतीने वागत नाही. त्यामुळे गांधींच्या विचारांकडेही नव्या पद्धतीने पाहावे लागेल.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *