मालेगावात प्रजासत्ताक दिनाच्या उत्साहावर विरजण:फुगे विक्रेत्याच्या सिलिंडरचा भीषण स्फोट, पोलिस परेड मैदानाजवळ झालेल्या दुर्घटनेत 5 जण गंभीर




देशभरात 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना नाशिकच्या मालेगावात एका दुर्दैवी घटनेने या आनंदावर विरजण पडले आहे. येथील पोलिस परेड मैदानापासून अवघ्या 250 मीटर अंतरावर एका फुगे विक्रेत्याच्या नायट्रोजन गॅस सिलिंडरचा अचानक भीषण स्फोट झाला. प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आणि प्रशासनाची एकच धावपळ झाली. या भीषण स्फोटात 5 जण गंभीर जखमी झाले असून, त्यामध्ये दोन लहान मुले, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आले आहे, तर इतरांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, या अपघाताचा सविस्तर तपास सुरू करण्यात आला आहे. मालेगावात 77 व्या प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा पोलिस परेड मैदानावर सुरू असतानाच, मैदानाबाहेर असलेल्या एका फुगे विक्रेत्याच्या नायट्रोजन गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. यावेळी मैदानावर अतिरिक्त जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती, तर बाहेर काही नागरिक आपल्या मुलांसाठी फुगे विकत घेण्यासाठी विक्रेत्याभोवती जमा झाले होते. या अचानक झालेल्या भीषण स्फोटात विनोद थोरात, मोहित जाधव, अतुल शेवाळे, प्रमिला यादव आणि उज्ज्वला महाजन हे पाच जण जखमी झाले असून, ध्वजारोहणाच्या उत्साही वातावरणात या दुर्दैवी घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की त्याचा आवाज दूरवर ऐकू गेला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकाएकी खळबळ उडाली. प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा सुरू असतानाच हा मोठा आवाज झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. परिणामी, हा एखादा दहशतवादी हल्ला किंवा घातपात असावा अशा चर्चा आणि अफवांना उधाण आले होते. मात्र, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *