इराणचा गर्जना – बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही   – VastavNEWSLive.com


काल मध्यपूर्वेतील युद्धाने पुन्हा एक धक्कादायक वळण घेतले. अमेरिकेचे KC-135 प्रकारचे हवाई इंधन भरणारे विमान, जे दुसऱ्या विमानांना हवेत इंधन पुरवते, ते इराणने पाडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत त्या विमानातील सहा जणांचा मृत्यू झाला असून त्या विमानाची किंमत तब्बल ६५ मिलियन डॉलर होती. या घटनेची कबुली अमेरिकेलाही द्यावी लागली आहे. मात्र, नेहमीप्रमाणे अमेरिकेने आपला बचाव करत सांगितले की ही घटना मैत्रीपूर्ण हवाई क्षेत्रात घडलेली दुर्घटना आहे शत्रूंनी ते पाडलेले नाही.

हेच कारण अमेरिकेने मागील आठवड्यात तीन अमेरिकन विमाने कोसळली तेव्हाही दिले होते. त्या वेळीही सांगितले गेले होते की ती विमाने शत्रूंनी पाडलेली नसून मैत्रीपूर्ण हवाई क्षेत्रात दुर्घटनाग्रस्त झाली. आता हे चौथे अमेरिकन विमान पडले आहे आणि तरीही तीच कथा सांगितली जात आहे.

दरम्यान, इराणच्या नव्या सर्वोच्च नेतृत्वाकडून कठोर आणि थेट संदेश देण्यात आला आहे. मुस्तफा अली खान यांनी पहिल्यांदाच राष्ट्राला उद्देशून केलेल्या वक्तव्यात स्पष्ट शब्दांत सांगितले की इराण मागे हटणार नाही. त्यांनी असा दावा केला की इराणच्या सर्वोच्च धार्मिक नेत्यांवर हल्ला त्या वेळी झाला जेव्हा ते धार्मिक ग्रंथांचे वाचन करत होते. हा केवळ हल्ला नव्हता तर इराणच्या स्वाभिमानावरचा घाव होता, असे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांनी ठाम शब्दांत जाहीर केले की हॉर्मुझच्या सामुद्रधुनी (Strait of Hormuz) आम्ही उघडणार नाही. जगातील महासत्ता रशिया आणि चीन यांनी शांततेचा संदेश दिला, युद्ध थांबवण्याचा सल्ला दिला, परंतु इराणने तो सरळ नाकारला. मुस्तफा अली खामनाई  यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले मागे आम्ही १२ दिवसांचे युद्ध थांबवले होते. त्याचा परिणाम काय झाला हे आम्हाला माहीत आहे. यावेळी आमच्या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत युद्धविराम होणार नाही.

त्यांनी आणखी एक कठोर संदेश दिला
इराणमध्ये मारल्या गेलेल्या कमांडर, निरपराध नागरिक आणि लहान मुलांच्या रक्ताचा बदला घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. जखमी नागरिकांच्या उपचारांची जबाबदारी सरकार घेईल आणि आमची खरी ताकद आमची जनता आहे. यावरून स्पष्ट दिसते की इराणी नेतृत्व आपल्या जनतेला एकत्र करून राष्ट्रीय एकजुटीचा ज्वालामुखी पेटवण्याचा प्रयत्न करत आहे.

युद्धाच्या या गोंधळात आणखी एक विचित्र गोष्ट समोर आली आहे. यूएईमध्ये झालेल्या नुकसानीची छायाचित्रे बाहेर येत नाहीत. कारण तेथील सरकारने स्पष्ट इशारा दिला आहे. कोणीही युद्धाशी संबंधित व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला तर त्याला थेट जेलमध्ये डांबले जाईल. आधीच अनेकांना अटक करण्यात आली आहे.

म्हणूनच जगाला युद्धाचे खरे चित्र दिसत नाही. इराणमधील हल्ल्यांची काही छायाचित्रे दिसतात, इस्रायलमधील काही दृश्ये दिसतात, पण अमेरिकन सैन्याचे नुकसान जवळजवळ पूर्णपणे लपवलेले आहे.

दरम्यान भारतासाठीही ही परिस्थिती चिंतेची ठरली आहे. फारसच्या खाडीत भारतीय तिरंगा असलेली २८ जहाजे अडकलेली आहेत, त्यापैकी २४ पश्चिमेकडे अडकली आहेत. त्यांना हॉर्मुझ सामुद्रधुनी पार करण्याची परवानगी मिळालेली नाही. भारत सरकारने सांगितले आहे की परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री यांच्याशी तीन वेळा चर्चा केली आहे, परंतु अंतिम निर्णय काय होईल हे अद्याप स्पष्ट नाही.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून सांगितले की त्यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा केली असून भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबद्दल संवाद झाला आहे. मात्र अडकलेल्या भारतीय जहाजांना मार्ग मिळेल की नाही, याबद्दल अजूनही अनिश्चितता कायम आहे.

दरम्यान सॅटेलाइट छायाचित्रांमधून असे दिसत आहे की अरब देशांमधील अमेरिकन सैनिकी तळांवर मोठे नुकसान झाले आहे. इराणचा स्पष्ट संदेश आहे—
जर तुम्हाला शांतता हवी असेल तर अमेरिकेला सांगा की अरब देशांमधील त्यांचे सर्व सैनिकी तळ हटवावेत.

इराणच्या वरिष्ठ सल्लागार अली लारी जानी यांनी कठोर इशारा दिला आहे
युद्ध सुरू करणे सोपे असते. पण काही ट्विट करून कोणी युद्ध जिंकत नाही. आमच्या चुका म्हणत तुम्ही माफी मागेपर्यंत आम्ही थांबणार नाही.

हॉर्मुझच्या पाण्यात इराणने असे अत्याधुनिक तारपीडो  तैनात केले आहेत जे २४ तास पाण्याखाली राहू शकतात आणि नंतर अचानक हल्ला करू शकतात. त्यामुळे जागतिक तज्ज्ञ प्रश्न विचारत आहेत जर अमेरिकेचे म्हणणे खरे असेल की इराणची ताकद संपली आहे, त्यांचे हवाईदल व नौदल नष्ट झाले आहे, तर मग अमेरिका स्वतःचे नौदल पाठवून अडकलेली तेलवाहू जहाजे का बाहेर काढत नाही?

इस्रायलमधील परिस्थितीही अत्यंत गंभीर आहे. तेल अवीव आणि हायफा  या शहरांवर क्षेपणास्त्रांचे माऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी हल्ल्याचा इशारा १५–२० मिनिटे आधी मिळत होता, पण आता तो फक्त १ ते १.५ मिनिटांवर आला आहे. त्यामुळे नागरिकांना स्वतःला वाचवण्याची संधी जवळजवळ संपत चालली आहे.

दुबईमध्येही वातावरण तणावपूर्ण झाले आहे. अनेक बँका बंद असल्याच्या चर्चा आहेत. सोशल मीडियावर काही लोक दुबई संपली असे लिहित आहेत; पण अशा पोस्ट करणाऱ्यांना थेट तुरुंगात टाकले जात आहे.

कोण जिंकेल आणि कोण हरेल हे आज सांगणे अशक्य आहे. कारण युद्धाचा निकाल रणांगणावर ठरतो ट्विटरवर नाही. मात्र आजच्या परिस्थितीत इतके स्पष्ट दिसते की इराण युद्धविराम फक्त आपल्या अटींवरच करेल.

या संघर्षात इराणचे प्रचंड नुकसान झाले आहे. १३०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू, हजारो जखमी पण त्यांची इच्छाशक्ती अजूनही तुटलेली नाही.

आता पुढे दिवसभर काय घडते ते जग पाहणार आहे. पण शेवटी एकच प्रार्थना
देवा, युद्ध पेटवणाऱ्यांना सद्बुद्धी दे. आणि हे रक्तरंजित युद्ध जितक्या लवकर संपेल तितके मानवजातीसाठी चांगले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *