![]()
अमरावती आणि भातकुळी तालुक्यांसाठी संयुक्तपणे कार्यरत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बहुप्रतिक्षित विभाजनाला आता वेग आला आहे. जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांच्या कार्यालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली असून, भातकुळी तालुक्यासाठी नवीन कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीवरील काँग्रेसच्या राजवटीला अप्रत्यक्षपणे धक्का बसला आहे. विभाजनानंतर दोन्ही बाजारपेठांमध्ये प्रशासकांनी पदभार स्वीकारला असून, शनिवारपासून सर्व व्यवहार त्यांच्या नियंत्रणात सुरू झाले आहेत. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासकाची सूत्रे उपनिबंधक सुधीर खंबायत यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. त्यांना सहकार अधिकारी अविनाश महल्ले आणि तालुका लेखा परीक्षक प्रशांत गुल्हाने प्रशासक म्हणून मदत करतील. भातकुळी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी सहकार अधिकारी अजहर खान सत्तार खान हे मुख्य प्रशासक असतील, तर भातकुळी तालुक्याचे लेखा परीक्षक ज्ञानेश्वर जगताप त्यांना सहाय्य करतील. प्रशासनाच्या माहितीनुसार, भातकुळी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत भातकुळी, आष्टी आणि खोलापूर येथील उपबाजारपेठांचा कारभार येईल. तर, अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीकडे अमरावतीसह बडनेरा, शिराळा आणि माहुली या उपबाजारपेठांचा कारभार राहील. दरम्यान, सहकार विभागाने संपूर्ण व्यवस्था उद्ध्वस्त करून ही संस्था स्वतःच्या हाती घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मावळत्या संचालक मंडळाचा कार्यकाळ पूर्ण होण्यास अजून बराच कालावधी शिल्लक होता. त्यामुळे येत्या काळात हे प्रकरण काय वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त झाल्यानंतर भातकुळीसाठी नवीन कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेअंतर्गत दोन्ही समित्यांसाठी नवीन संचालक मंडळ अस्तित्वात येतील. त्यासाठी आगामी सहा महिन्यांत नव्याने निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिश मोरे यांनी दिला आहे. ते म्हणाले, “कार्यकाळ संपण्यापूर्वीच संचालकत्व बरखास्त केल्यामुळे सरकारचा निर्णय एकतर्फी वाटतो. पदाधिकारी या नात्याने सदर निर्णयाबाबत आम्हाला पूर्वकल्पना देणे अपेक्षित होते, परंतु तसे काहीही झाले नाही. थेट वृत्तपत्रातूनच संचालक मंडळ बरखास्त झाल्याचे कळले. त्यामुळे या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयाचे दार ठोठावणार आहोत.”
भातकुळीत नवीन कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापनेचा मार्ग मोकळा:अमरावती बाजार समितीचे विभाजन, संचालक मंडळ बरखास्त
