पुण्यात कौटुंबिक वादातून महिलेचा खून:पतीला अटक, नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई गावात घटना




पुण्यात कौटुंबिक वादातून एका 19 वर्षीय महिलेचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. ही घटना नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई गावात घडली असून, पोलिसांनी तिचा पती शैलेंद्र प्रकाश व्हटकर (वय 30) याला अटक केली आहे. मृत महिलेचे नाव नम्रता शैलेंद्र व्हटकर (वय 19, रा. बालाजी सोसायटी, शिरसवाडी, वाडेबोल्हाई) असे आहे. तिचा पती शैलेंद्र व्हटकर (रा. बकोरी, ता. हवेली) याला लोणीकंद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शाहरुख दस्तगीर पठाण (वय 23) यांनी या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शैलेंद्र आणि नम्रता यांच्यात कौटुंबिक कारणांवरून नेहमी वाद होत असत. शैलेंद्रने नम्रताकडे सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली होती, यावरून त्यांच्यात मोठा वाद झाला. याच वादातून शैलेंद्रने नम्रतावर धारदार शस्त्राने अनेक वार केले. गंभीर जखमी झालेल्या नम्रताला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त सोमय मुंडे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपी शैलेंद्रला पोलिसांनी अटक केली असून, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक खेडकर पुढील तपास करत आहेत. दरम्यान, पुण्यातील वारजे भागातही पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. आकाशनगर परिसरातील टेकडीवर या तरुणाचा मृतदेह आढळून आला. खून झालेल्या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याचे वय अंदाजे 40 वर्षे असून, अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस शिपाई भूषण निकम यांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वनविभागाच्या जागेत टेकडीवर एक तरुण मृतावस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम, वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक नीलेश बडाख यांनी घटनास्थळी भेट दिली. तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले होते आणि ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा दगडाने ठेचण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिस तरुणाची ओळख पटवण्याचे काम करत असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक व्ही. काईंगडे पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *