![]()
मोर्शीतील समर्थ कॉलनीमध्ये रूपेश उज्जैनकर यांच्या घरी परळ जातीचा साप आणि त्याची तब्बल ३९ पिल्ले आढळून आल्याने खळबळ उडाली. जीवनसेतू जलमित्र आपत्ती बचाव बहुउद्देशीय संस्था आणि कार्स संस्थेच्या सर्पमित्रांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून साप आणि त्याच्या पिल्लांची यशस्वी सुटका केली. ही घटना गुरुवार, २ जुलै रोजी सकाळी घडली. उज्जैनकर कुटुंब नेहमीच्या घरगुती कामात व्यस्त असताना त्यांना हे सापाचे कुटुंब दिसले. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने सापाची पिल्ले आढळल्याने उज्जैनकर कुटुंब घाबरले होते. त्यांचे घर वनपरिक्षेत्र उद्यानाच्या कंपाऊंडला लागून आहे. माहिती मिळताच, मोर्शी शहरात कार्यरत असलेल्या जीवनसेतू जलमित्र आपत्ती बचाव बहुउद्देशीय संस्था आणि कार्स संस्थेचे सर्पमित्र पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या पथकात जीवनसेतू संस्थेचे प्रियांशू तायवाडे, विवेक सावरकर, शेषांद्री वयले, श्रवण खुरपे, तौफीक शेख आणि कार्स संस्थेचे अभय दामेधर, महेश बाबुले यांचा समावेश होता. त्यांनी अत्यंत दक्षतेने आणि कौशल्याने साप व त्याच्या सर्व ३९ पिल्लांना सुरक्षितपणे पकडले. सर्पमित्रांनी साप आणि त्याची सर्व पिल्ले त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून त्यांना जीवनदान दिले. या यशस्वी बचाव कार्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. दोन्ही संस्थांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पावसाळ्यात घरात किंवा परिसरात साप अथवा इतर वन्यप्राणी आढळल्यास घाबरू नका. त्यांना मारण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नका. साप निसर्गातील एक महत्त्वाचा घटक असून, त्यांचे संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. साप दिसल्यास तात्काळ प्रशिक्षित सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मोर्शीत परळ सापासह 39 पिल्ले आढळली:जीवनसेतू व कार्स संस्थेने केली यशस्वी सुटका
