जनाब उद्धव ठाकरे रामरक्षा नव्हे, पक्षरक्षा करत आहेत:रामरक्षा आंदोलनावरून नवनीत राणांची टीका, 18 जुलैला करणार हनुमान चालीसा पठण




अयोध्येतील राम मंदिराच्या देणगी पेटीत झालेल्या कथित चोरीच्या प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता नागपुरात १८ जुलै रोजी ‘रामरक्षा पठण’ आंदोलन करणार आहेत. या आंदोलनावरून भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली आहे. अमरावती येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राणा यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘जनाब उद्धव ठाकरे’ असा करत त्यांना थेट अयोध्येचे दर्शन आणि हनुमान चालिसा प्रकरणाची आठवण करून दिली. ‘जनाब उद्धव ठाकरेंना’ रामलल्लाची आठवण कशी झाली? “जेव्हा अयोध्येत रामलल्लाचे भव्य मंदिर उभे राहिले आणि देश-विदेशातून भक्त तिथे गेले, तेव्हा ‘जनाब’ उद्धव ठाकरे कुठे लपले होते?” असा बोचरा सवाल राणा यांनी केला. “पक्ष बरबाद झाल्यानंतर, आमदार आणि खासदार सोडून गेल्यानंतर आता त्यांना रामलल्लाची आणि रामरक्षेची आठवण आली आहे. जे कधी दर्शनालाही गेले नाहीत, ते रामरक्षा काय करणार? ते रामरक्षा करत नाहीत, तर उरलेल्या पक्षाची ‘पक्षरक्षा’ करत आहेत,” असा सणसणीत टोला नवनीत राणा यांनी लगावला. ‘हनुमान चालिसाचे पठण करायला अमरावतीला या’ आपल्याला झालेल्या अटकेची आठवण करून देत राणा म्हणाल्या, “मी जेव्हा हनुमान चालिसा वाचण्याची परवानगी मागितली, तेव्हा जनाब उद्धव ठाकरेंच्या अहंकारामुळे मला 14 दिवस जेलमध्ये राहावे लागले. पण आज तेच जय श्रीरामचे नारे देत आहेत. माझी त्यांना विनंती आहे की, नागपूरवरून 150 किलोमीटर दूर अमरावतीला आमच्या हनुमानगढीवर या, आम्ही तुमचे स्वागत करू आणि सोबत बसून हनुमान चालिसाचे पठण करू.” आरएसएस कार्यालयात जाऊन नतमस्तक व्हा नागपूरमध्ये रामरक्षा करण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाऊन दर्शन घ्यावे आणि नतमस्तक व्हावे, असा खोचक सल्ला नवनीत राणा यांनी दिला. तसेच, “तुमच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्यासारखा देशद्रोह किंवा राजद्रोह लावणार नाहीत. ते स्वागत करायला तयार आहेत,” असेही त्या म्हणाल्या. ‘श्रीकृष्णाच्या नमाजा’च्या वक्तव्यावर मौलानांना सुनावले श्रीकृष्ण दिवसातून पाच वेळा नमाज पठण करत होते, या एका मौलानाच्या वादग्रस्त वक्तव्यावर राणा यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “हा कुठून आलेला मौलाना आहे मला माहीत नाही. हिंदू धर्म हा हजारो वर्षे जुना आहे. आम्ही कृष्णाला कायम मोठा टिळा (तिलक) लावून पाहिले आहे. त्यामुळे या मौलानाने आधी माथ्यावर मोठा टिळा लावून नमाज पठण करावे आणि मगच आमच्या भगवंतावर बोलण्याची लायकी ठेवावी,” असे सडेतोड उत्तर त्यांनी दिले. राम मंदिरात चोरी करणाऱ्यांना सोडणार नाही राम मंदिरातील चोरीच्या प्रकरणावर बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. “ज्या काँग्रेसने राम मंदिर होऊ दिले नाही, त्यांना यावर बोलण्याचा अधिकार नाही. देशाच्या चौकीदारावर (पंतप्रधानांवर) माझा पूर्ण भरोसा आहे. ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ हे त्यांचे धोरण आहे. जर कुणी राम मंदिरात डाका टाकला असेल, तर त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही,” असा विश्वास राणा यांनी व्यक्त केला. मोफत साडी योजना आणि शेतकरी प्रश्न लाडक्या बहिणींची ‘मोफत साडी योजना’ बंद केल्याच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, “सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी, लाडकी बहीण आणि निराधार योजनांचा निधी वाढवण्याचे काम केले आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे साडी योजना बंद झाली असेल, पण हे सरकार नेहमी महिला आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.” नवनीत राणांचेही हनुमान चालीसा पठण दरम्यान, माजी खासदार नवनीत राणा या देखील १८ जुलै रोजी उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाच्या विरोधात हनुमान चालीसा पठण करणार आहेत. अमरावतीतील हनुमान गढी येथे हनुमान चालीसाचे पठण होणार आहे. यासंदर्भात बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, “माझे देव आणि माझी भक्ती हे कोणालाही उत्तर देण्याकरिता नसते. कारण 14 दिवस जेव्हा जेलामध्ये मी राहिले, एक महिला खासदार म्हणून तेथील प्रत्येक क्षण मी त्या जेलमध्ये कसे काढले ते मला आणि माझ्या परिवाराला माहीत आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *