पालकमंत्री अतुल सावे यांनी विष्णुपुरी उड्डाणपुलाच्या घटनेची केली पाहणी ;दोषींवर होणार कठोर कारवाई 


नांदेड – नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील विष्णुपुरी येथे श्री गुरुगोबिंदसिंहजी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलाच्या बाजूचा खालचा भाग अचानक कोसळल्याच्या घटनेची राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग सक्षमीकरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आज घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

या घटनेची शासनाने गांभीर्याने दखल घेतली असून, केंद्रीय उच्चस्तरीय तज्ज्ञ पथकाने दोन दिवसांपूर्वी घटनास्थळी भेट देऊन उड्डाणपुलाच्या संरचनेची सखोल तांत्रिक तपासणी केली आहे. चौकशीत बांधकामातील त्रुटी, निकृष्ट दर्जाचे साहित्य, कामातील निष्काळजीपणा अथवा संबंधित यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारची हयगय झाल्याचे आढळल्यास दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री श्री. सावे यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री श्री. सावे यांनी उड्डाणपुलाच्या कोसळलेल्या भागाची पाहणी करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), संबंधित बांधकाम संस्था आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. उड्डाणपुलाच्या उर्वरित संरचनेची सुरक्षितता, स्थिरता आणि गुणवत्तेची तपासणी करून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

उड्डाणपुलाच्या बांधकामाची गुणवत्ता, वापरण्यात आलेल्या साहित्याचा दर्जा, संरचनात्मक मजबुती तसेच तांत्रिक बाबींची सखोल तपासणी करण्यासाठी आयटीची टीम बोलावणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या आवश्यक ती दुरुस्ती, सुधारणा आणि पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरात पर्यायी मार्गाने वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी दक्षता घ्यावी. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा मोठी दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी संपूर्ण उड्डाणपुलाची तांत्रिक तपासणी करण्यात येत असून चौकशी अहवालाच्या आधारे जबाबदारी निश्चित करून दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली.

यावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार भीमराव केराम, आमदार राजेश पवार, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, संबंधित तांत्रिक अधिकारी, जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Post Views: 64






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *