![]()
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरमधील राजकीय घडामोडी, हिंदुत्वावरची भूमिका, बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी आणि बदलापूरमधील बालिकेवरील अत्याचार प्रकरण या तिन्ही मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतील सध्याच्या वादावर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केलं की, आजच महापालिकेत गट स्थापन होणार असून गटनेताही निश्चित झाला आहे. चंद्रपूरच्या विकासासाठी आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस आणि मित्रपक्ष ठामपणे काम करणार असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं. महापौर कोण होणार, स्थायी समितीची रचना कशी असेल, यासंदर्भातील सर्व निर्णय आधीच झाले असून संध्याकाळपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. चंद्रपूरच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या गदारोळावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, केवळ सत्तेसाठी नव्हे तर शहराच्या विकासासाठी काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. नागरिकांचे मूलभूत प्रश्न, पायाभूत सुविधा, रोजगार आणि शहराच्या एकूण प्रगतीसाठी आम्ही काम करणार आहोत. महापौरपदाबाबतही कोणतीही अनिश्चितता नाही. योग्य निर्णय झाला असून आज संध्याकाळपर्यंत चंद्रपूरचा नवा महापौर कोण असेल, हे स्पष्ट होईल. स्थायी समितीबाबतही निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचं त्यांनी सांगितलं. सत्ताधाऱ्यांकडून केवळ संभ्रम निर्माण केला जात असून प्रत्यक्षात चित्र वेगळंच आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देताना विजय वडेट्टीवार भावुक झाले. काँग्रेसमध्ये येऊन आपल्याला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याचं सांगताना त्यांनी सुरुवातीच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केल्याची आठवण सांगितली. बाळासाहेबांनी कधीही जात, पात, धर्म यावरून भेदभाव केला नाही, असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं. त्यांचं हिंदुत्व हे बेगडी नव्हतं, ते देशासाठी होतं. आजचे सत्ताधारी निवडणुकीसाठी हिंदुत्वाचा वापर करतात, मात्र बाळासाहेबांनी कधीही पद देताना जात किंवा धर्म विचारला नाही, असा ठाम दावा वडेट्टीवार यांनी केला. बाळासाहेब रोखठोक होते, स्पष्ट बोलायचे आणि कुणाचाही मुलाहिजा न बाळगणारे नेते होते, असं त्यांनी नमूद केलं. बाळासाहेबांचा पाठिंबा नसता तर भाजपला कोणी विचारलंही नसतं वैयक्तिक आठवणी सांगताना वडेट्टीवार म्हणाले की, बाळासाहेब मला अनेकदा नक्षलवादी म्हणायचे, पण तरीही त्यांचं मन खूप मोठं होतं. मीनाताईंनी स्वतःच्या हाताने मला जेवण वाढलं होतं, ही आठवण आजही मनात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच विजय वडेट्टीवार राजकारणात पुढे आला, हे त्यांनी खुलेपणाने मान्य केलं. बाळासाहेब जितके कठोर होते, तितकेच ते मनाने हळवेही होते. त्यांच्या नेतृत्वामुळेच देशात भाजपला चांगले दिवस आले आणि ते सत्तेत आले, असा दावा करत वडेट्टीवार म्हणाले की, बाळासाहेबांचा पाठिंबा नसता तर भाजपला कोणी विचारलंही नसतं. बाळासाहेबांचं हिंदुत्व राष्ट्रीय होतं, तर आजचं हिंदुत्व सत्तेसाठी आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली. बाळासाहेबांची जयंती असल्याने त्यांनी त्यांना अभिवादन केलं आणि बाळासाहेबांचं नाव कोणीही पुसू शकणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. गृहविभागाचा धाक उरलेला नाही बदलापूरमधील बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेवर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी भाजपवर थेट आरोप केले. ही बालिकेवरील अत्याचाराची दुसरी घटना असल्याचं सांगत त्यांनी पहिल्या प्रकरणातील आरोपीला भाजपकडून संरक्षण देण्यात आलं, असा गंभीर आरोप केला. याआधीच्या प्रकरणातील आरोपीला स्वीकृत नगरसेवक बनवण्यात आलं होतं, ही बाबच सत्ताधाऱ्यांची मानसिकता दाखवते, असं ते म्हणाले. अशा घटनांमुळे पोलिसांचा धाक संपला आहे, गृहविभागाचाही धाक उरलेला नाही, अशी कठोर टीका त्यांनी केली. कायदा आणि सुव्यवस्थेची अवस्था ढासळली वडेट्टीवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराचा कळस झाला आहे. आज महिलांसाठी महाराष्ट्र सुरक्षित राहिलेला नाही, हे दुर्दैवी वास्तव आहे. सत्ताधारी कमिशनखोरीत मश्गूल असून कोणी आमचं वाकडं करू शकत नाही अशा पद्धतीनं राजकारणी वागत आहेत, असा आरोप त्यांनी केला. महिलांवरील गुन्ह्यांमध्ये आरोपींना राजकीय संरक्षण मिळत असल्यानेच अशा घटना वारंवार घडत आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. सरकारकडून केवळ घोषणाबाजी होत असून प्रत्यक्षात कायदा आणि सुव्यवस्थेची अवस्था ढासळली आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी यावेळी केला. चंद्रपूरमधील सत्तेचं चित्र आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट एकीकडे चंद्रपूरमधील सत्तासंघर्ष, दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वावरची तुलना आणि तिसरीकडे बदलापूरमधील संतापजनक घटना, या सगळ्या मुद्द्यांवरून विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. चंद्रपूरमधील सत्तेचं चित्र आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल, असा दावा करत असतानाच त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता असून, सत्ताधारी यावर काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
बाळासाहेबांचा पाठिंबा नसता तर भाजपला कोणी विचारलंही नसतं:विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल; म्हणाले- गृहविभागाचा धाक नाही
