संगम अर्बन मल्टीस्टेटची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
दोन वर्षांत ३१ कोटींच्या ठेवी; शून्य एनपीएसह २२ कोटींचे कर्जवाटप — आगामी काळात ८ टक्के लाभांशाचे अध्यक्ष गजानन वडजे पाटील यांचे आश्वासन
नांदेड, दि. ३० (प्रतिनिधी) : नवीन मोंढा परिसरातील मुख्य कार्यालय असलेल्या संगम अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. ३०) शिवाजीनगर औद्योगिक वसाहतीतील हॉटेल विसावा येथे उत्साहात पार पडली. संस्थेने अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत ३१ कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठला असून, २२ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. विशेष म्हणजे संस्थेचे एकही कर्जखाते एनपीएमध्ये गेले नसल्याची माहिती अध्यक्ष गजानन वडजे पाटील यांनी सभेत दिली.
सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना गजानन वडजे पाटील यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला. सभासद, संचालक मंडळ आणि हितचिंतकांच्या विश्वासामुळे संस्थेने अल्पावधीत उल्लेखनीय प्रगती साधली असून, ही वाटचाल पुढील काळात अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेची आर्थिक कामगिरी आणि सभासदांचा विश्वास कायम राखत आगामी काळात ८ टक्के लाभांश देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
सभेत मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या ताळेबंद व नफा-तोटा पत्रकास मान्यता देण्यात आली. तसेच याच आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेऊन त्यास मंजुरी देण्यात आली. आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी लेखापरीक्षक म्हणून आशिष गांजेवार यांच्या फर्मची नियुक्ती करण्यासही सभेने मान्यता दिली.
संस्था नुकतीच कार्यरत झाल्याने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी स्वतंत्र अंदाजपत्रक तयार करण्यात आले नसल्याची माहिती देण्यात आली. आगामी आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या अंदाजपत्रकास सभेने मंजुरी दिली. अनुपस्थित सभासदांच्या रजेलाही मान्यता देण्यात आली.
संस्थेच्या विस्ताराच्या दृष्टीने आगामी काळात आणखी दोन ते तीन शाखा सुरू करण्याचा मानस असून, त्यासाठी केंद्रीय सहकारी संस्था निबंधकांकडे आवश्यक परवानगीचा प्रस्ताव पाठविण्यास सभेने मंजुरी दिली.
यावेळी उपाध्यक्ष व्यंकटराव पा. चांडोळकर, संचालिका प्रियंका गजानन वडजे, संचालक गुरुराज पाटील, डॉ. कैलास भाडेकर, अॅड. बालाजी जाधव, बालाजी कल्याणकर, संचालिका ज्योती दीपक डांगे यांच्यासह संस्थेचे सभासद, अधिकारी-कर्मचारी, हितचिंतक व संगम अर्बन मल्टीस्टेट परिवारातील मित्र-स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“सभासदांचा विश्वास हीच संस्थेची खरी ताकद”
“अवघ्या दोन वर्षांत संस्थेने ३१ कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठला असून २२ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. संस्थेचे एकही कर्जखाते एनपीएमध्ये गेलेले नाही, ही आमच्यासाठी मोठी उपलब्धी आहे. सभासदांचा विश्वास कायम ठेवून संस्थेचा विस्तार आणि आर्थिक बळकटीकरण करण्यावर आमचा भर आहे. आगामी काळात सभासदांना ८ टक्के लाभांश देण्याच्या दिशेने संस्थेची वाटचाल राहील.”
गजानन वडजे पाटील, अध्यक्ष, संगम अर्बन मल्टीस्टेट नांदेड
