![]()
पुणे महापालिका निवडणुकीत दोस्तीत कुस्ती करणाऱ्या भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. भाजपने उपमुख्यमंत्री तथा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना पुणे जिल्ह्यातच रोखण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या कारभाराची गोपनीय चौकशी सुरू केल्याची रणनीती आखली आहे. यामुळे पुण्यात पुन्हा एकदा अजित पवार विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगण्याची चिन्हे आहेत. अजित पवारांनी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत भाजपवर तीव्र हल्ले चढवले होते. पुण्यातील त्रिकूट तर पिंपरी चिंचवडमध्ये आमदार महेश लांडगे यांच्यावर त्यांनी तिखट टीका केली होती. प्रत्युत्तरादाखल महेश लांडगेंनीही अजित पवारांवर जोरदार पलटवार करत निवडणुकीत रंगत आणली होती. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अजित पवारांचे नाव न घेता त्यांना आरसा पाहण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर प्रत्यक्ष निकालात भाजपचा प्रचंड विजय झाला, तर राष्ट्रवादीचा मानहाणीकारक पराभव झाला. त्यानंतर आता हे दोन्ही पक्ष जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत एकमेकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत. अजित पवारांना जिल्ह्यातच रोखण्याचा डाव यासंबंधीच्या माहितीनुसार, भाजपने जिल्हा परिषदेच्या कारभाराची गोपनीय सुरू केला आहे. या चौकशीचा वापर जिल्हा परिषदेच्या प्रचारात पवारांना अडचणीत आणण्यासाठी केला जाणार आहे. भाजपने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वच 73 जागांवर सक्षम उमेदवार दिलेत. यामाध्यमातून पक्षाने राष्ट्रवादीपुढे कडे आव्हान उभे केले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी या निवडणुकीला एकत्रपणे सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, बहुतांश ठिकाणी हे दोन्ही गट एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढताना दिसतील. या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार, खासदार अमोल कोल्हे आदी नेत्यांच्या बैठकांवर बैठका झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील दोन्ही खासदार शरद पवार गटाचे आहेत. तर 10 पैकी 8 आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांनी भाजपचा वारू रोखण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. भाजपने अजित पवारांविरोधातील नेत्यांना धरले हाताशी दुसरीकडे, भाजपने अजित पवारांच्या जिल्ह्यातील राजकीय ताकदीला शह देण्यासाठी माजी आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप आदींना पक्षात प्रवेश दिला आहे. याशिवाय इंदापूर येतील नाराज प्रदीप गारटकरही भाजपवासी झालेत. हे ही वाचा… मुंबईत ठाकरेंना मोठा दिलासा!:काल दिवसभर ‘नॉट रिचेबल’ नगरसेविका मध्यरात्री स्वगृही; मिलिंद नार्वेकरांच्या मध्यस्थीने ‘नाट्य’ संपले
मुंबई महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेच्या रणधुमाळीत काल दिवसभर सुरू असलेला ‘नॉट रिचेबल’चा सस्पेन्स अखेर मध्यरात्री संपला आहे. प्रभाग १५७ मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के या पुन्हा पक्षाच्या संपर्कात आल्या आहेत. मध्यरात्री त्या आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या असून, आज त्या मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. वाचा सविस्तर
