बजाज पुणे ग्रँड टूरचा पहिला टप्पा 20 जानेवारीला:91.8 किमी अंतर, हिंजवडी येथून सुरुवात, आकुर्डीत समारोप




‘बजाज पुणे ग्रँड टूर–२०२६’ अंतर्गत पहिल्या टप्प्याचे आयोजन मंगळवार, २० जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे. ९१.८ किलोमीटर अंतराचा हा टप्पा दुपारी १ वाजून ३० वाजता टी.सी.एस सर्कल, हिंजवडी येथून सुरू होऊन डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट, आकुर्डी येथे दुपारी ४ वाजेच्या सुमारास समाप्त होईल. या टप्प्याच्या आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासह मुळशी व मावळ तालुक्यातून जाणाऱ्या संपूर्ण स्पर्धा मार्गाची प्रशासनाकडून सखोल पाहणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पर्यटनाची प्रचंड क्षमता असलेली ठिकाणे जागतिक नकाशावर यावीत, त्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळावी तसेच स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा मार्गावर आवश्यकतेनुसार वाहतूक वळविण्यात येणार असून काही कालावधीसाठी मार्ग बंदही ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या टप्प्यातील मार्ग टी.सी.एस सर्कल, हिंजवडी फेज-३ येथून सुरू होऊन माण–अंबवडे गाव कमान–पौड–चाले–नांदगाव–कोळवण–हडशी लेक–जावण–तिकोना पेठ–काले–कडधे–थुगाव–शिवणे–डोणे–सावळे चौक–आढळे बुद्रुक–बेबडओहळ–चंदनवाडी–चांदखेड–कासारसाई–नेरे–मारुंजी–लक्ष्मी चौक–भूमकर चौक–डांगे चौक–श्री संत नामदेव महाराज चौक मार्गे डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट, आकुर्डी येथे संपेल. बजाज पुणे ग्रँड टूरचे नेटके आयोजन: जागतिक सायकलिस्टच्या उत्साहवर्धक प्रतिक्रिया हेडन जेम्स (ऑस्ट्रेलिया – टीम नेक्स्ट वेलोफिट) मी ‘नेक्स्ट वेलोफिट’ संघाचे प्रतिनिधित्व करतोय. इथे पुण्यात येऊन मला खूप आनंद झाला आहे. स्पर्धेचे नियोजन अतिशय चोख आणि उत्तम आहे. आता प्रत्यक्ष शर्यतीसाठी मी खूप उत्सुक आहे. आम्ही काल पहिल्या टप्प्यातील मार्गाची पाहणी केली. येथील रस्ते सायकलिंगसाठी अगदी योग्य आहेत. आमची राहण्याची व्यवस्था आणि इथले जेवणही उत्तम आहे. लोक खूप प्रेमळ आहेत. तावी कन्निमे (एस्टोनिया – क्विक प्रो टीम) मी एस्टोनियाहून आलो असून ‘क्विक प्रो’ संघाचा भाग आहे. मला येथील निसर्ग, ट्रॅक आणि एकूणच वातावरण खूप आवडले आहे. ही स्पर्धा आणि येथील उत्साह खरोखरच अप्रतिम आहे. मी नुकताच व्यावसायिक सायकलस्वार झालो आहे आणि माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच भारतात येऊन अशा मोठ्या स्पर्धेत भाग घेताना मला खूप अभिमान वाटतोय. पुण्यातील लोकांचे स्वागत पाहून मी भारावून गेलो आहे. प्रत्येकजण आमचा उत्साह वाढवत आहे, हे पाहून खूप छान वाटते. जॉन (ऑस्ट्रेलिया) “येथील रस्ते सायकल चालवण्यासाठी खूप चांगले, गुळगुळीत आणि वेगवान आहेत. आजचा मार्ग चांगला होता, पण उद्या काही कठीण चढाव (climb) आहेत, ज्यासाठी आम्ही तयार आहोत. पुण्यातील प्रेक्षकांचा प्रतिसादही थक्क करणारा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *