इतवारा पोलिसांची गुटख्याच्या टेम्पोवर धडक कारवाई; २६.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड


प्रतिबंधित गुटखा, सुगंधित पानमसाला आणि जर्दाची अवैध वाहतूक; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरात प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत अशोक लेलँड कंपनीच्या टेम्पोसह एकूण २६ लाख २९ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत १६ ऑक्टोबर २०२६ रोजी इतवारा पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक गस्तीवर असताना पहेलवान टी हाऊस परिसरात पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून प्रतिबंधित गुटख्याच्या वाहतुकीची माहिती मिळाली.

टायरबोर्डकडून चौफाळा मार्गे एका काळ्या रंगाच्या टेम्पोतून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि जर्दाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी विणकर कॉलनी कमानीजवळ, भोपळे हॉस्पिटलसमोर सापळा रचला. संशयित टेम्पो (क्रमांक एमएच २६ बीई ९०७१) थांबवून पंचांसमक्ष त्याची तपासणी करण्यात आली. टेम्पो चालक सोहेल खान बाबर खान (वय २९, रा. खडकपुरा, वजीराबाद, नांदेड) याच्याकडे चौकशी केली असता वाहनातून प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. हा माल विनापरवाना आणि बेकायदेशीर विक्रीच्या उद्देशाने वाहून नेला जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईत निष्पन्न झाले.

असा आहे जप्त मुद्देमाल

पोलिसांनी केलेल्या कारवाईत राजनिवास सुगंधित पानमसाला, किंमत १ लाख १ हजार २५० रुपये, झेडएल जाफराणी जर्दा, किंमत १७ लाख २८ हजार रुपये, तसेच अशोक लेलँड टेम्पो, किंमत ८ लाख रुपये, असा एकूण २६ लाख २९ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सोहेल खान बाबर खान याच्यासह मोहम्मद मतीन मोहम्मद मुजफ्फर (रा. देगलूर नाका, इतवारा, नांदेड) याच्याविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील कलम १२३, २७४, २७५, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद मतीन मुजफ्फर हा या प्रकरणात फरार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जळबाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर देशमुख आणि पोलीस अंमलदार बंडू कलंदर, बालाजी हिंगणकर, सदाशिव कदम, रेवणनाथ कोरनुळे, हरजितसिंग सुखई, शेख इस्राईल, साहेबराव जगताप आणि मारोती गिते यांच्या पथकाने केली. जिल्ह्यात अवैध शस्त्रे, दारू, जुगार, गुटखा, अमली पदार्थांची विक्री व साठवणूक तसेच अन्य अवैध व्यवसायांविरोधात यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई सुरू राहील, असा इशारा नांदेड पोलिसांनी दिला आहे.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry