उल्हासनगरमध्ये 'वंचित'ला मोठा धक्का!:दोन नगरसेवकांचा शिंदे सेनेला पाठिंबा, उपमुख्यमंत्र्यांना भेटून पाठिंब्याचे पत्र सुपूर्द




उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या समीकरणांना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर, प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला (VBA) मोठा धक्का बसला आहे. पक्षाकडून निवडून आलेल्या दोन्ही नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटाला आपला अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे उल्हासनगरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर विजय मिळवलेले सुरेखा सोनावणे आणि विकास खरात या दोन नगरसेवकांनी नुकतीच मुंबईत एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या स्वाक्षरीचे पाठिंब्याचे पत्र शिंदे यांना सुपूर्द केले. या महत्त्वपूर्ण भेटीप्रसंगी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते. या दोन्ही नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे शिंदे सेनेचे पालिकेतील संख्याबळ अधिक मजबूत झाले आहे. विकासासाठी घेतला निर्णय आपल्या प्रभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे दोन्ही नगरसेवकांनी स्पष्ट केले. पाठिंबा देताना त्यांनी प्रामुख्याने ‘दलित वस्ती सुधार योजने’वर भर दिला. “आमच्या प्रभागाचा सर्वांगीण विकास व्हावा आणि दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण व्हावीत, ही आमची प्रमुख मागणी आहे. विकासासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याने आम्ही एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे,” असे त्यांनी यावेळी सांगितले. दिग्गजांची उपस्थिती या राजकीय घडामोडीवेळी शिंदे सेनेचे अनेक स्थानिक आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते. अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, नगरसेवक योगेश जानकर आणि प्रवक्ते राहुल लोंढे यांनी या नगरसेवकांचे स्वागत केले. या पाठिंब्यामुळे उल्हासनगर पालिकेतील सत्तास्थापनेत शिवसेना शिंदे गट आता अधिक प्रबळ स्थितीत आली आहे. उल्हासनगर महापालिकेत ‘वंचित’ने आपले अस्तित्व दाखवून दिले होते, मात्र निवडून आलेल्या दोन्ही नगरसेवकांनी सत्ताधारी गटाला पाठिंबा दिल्याने वंचित बहुजन आघाडीला हा मोठा झटका मानला जात आहे. उल्हासनगर महापालिका संख्याबळ (78/78) हे ही वाचा… भिवंडीत भाजप-माजी महापौरांच्या समर्थकांमध्ये हाणामारी:भाजप आमदाराचा आरोप – मुलांना मारहाण, कार्यालयावर दगडफेक भिवंडी येथे रविवारी महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि कोणार्क विकास आघाडी (KVA) च्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. हा वाद छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ झाला. दोन्ही बाजूंनी दगडफेकही झाली. भाजप आमदार महेश चौघुले आणि KVA नेते तसेच माजी महापौर विलास पाटील यांच्या समर्थकांमध्ये ही हाणामारी झाली. घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना पांगवले. सविस्तर वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *