एमआयटी विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित, ग्रामपंचायतींना कचरा प्रकल्पासाठी मुदत:पोलिस उपायुक्त डॉ. शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर सात दिवसांची मुदत




पुणे शहरातील मुळा-मुठा नदीपात्रात प्रक्रिया न करता कचरा टाकण्याविरोधात एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेले ‘कचरा बंद’ आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर ग्रामपंचायतींना कचरा प्रकल्प उभारण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी लोणी-काळभोर आणि कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींना कचरा प्रकल्प उभारणीसाठी सात दिवसांची मुदत दिली आहे. या काळात ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण केलेले ट्रॅक्टर नदीपात्रात सोडण्यास तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सात दिवसांत या गंभीर समस्येवर तोडगा न निघाल्यास आणि थेट कचरा टाकणे बंद न झाल्यास, दोन्ही ग्रामपंचायतींच्या कचरा गाड्यांना विद्यापीठातून प्रवेश नाकारण्यात येईल, असे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले आहे. पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे आणि लोणी-काळभोरच्या सहाय्यक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांच्या मध्यस्थीमुळेच हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात यश आले. याप्रसंगी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्यासह लोणी-काळभोर व कदमवाकवस्ती गावचे माजी सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, तसेच आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. या आंदोलनात एमआयटी विश्वशांती गुरुकुल, एमआयटी ज्युनिअर महाविद्यालय आणि एमआयटी एडीटी विद्यापीठातील हजारो विद्यार्थी व निवासी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी या विषयाची गंभीरता, भविष्यातील संभाव्य धोके, मुळा-मुठा नदीचे अस्तित्व, परिसरातील पर्यावरणाबाबत स्थानिक ग्रामपंचायतींची उदासीनता आणि प्रशासनाचे दुर्लक्ष याविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे गुरुवारी सकाळी लोणी-काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींच्या कचरा गाड्या दुपारी ३ वाजेपर्यंत विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर ताटकळत उभ्या होत्या. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर त्यांना विद्यापीठातून नदीपात्राकडे जाण्यासाठी तात्पुरती परवानगी मिळाली. यापूर्वी २६ फेब्रुवारी २०२६ रोजी नदीपात्रातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यांना भीषण आग लागली होती, जी तब्बल चार दिवस धुमसत राहिली. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात विषारी धुराचे लोट पसरले होते. या आगीमुळे आणि धुरामुळे एमआयटी एडीटी शैक्षणिक संकुलातील ६-७ विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास त्रास होऊन गुदमरल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले होते. या गंभीर आरोग्य समस्यांनंतरच विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन नदीपात्रात कचरा टाकणे बंद करण्यासाठी ‘कचरा बंद’ आंदोलन सुरू केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *