![]()
नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात गुरुवारी दिवसाढवळ्या एका तरुणाची हत्या करण्यात आली. पत्नीने पतीच्या मदतीने आपल्या महाविद्यालयीन प्रियकराचा खून केल्याचे समोर आले आहे. सागर वानखेडे (रा. सावंगी, ता. नरखेड, जि. नागपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी राजू गजभिये आणि त्याची पत्नी सोनाली गजभिये (रा. वार्ड क्रमांक २, खापरखेडा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, सोनाली गजभिये आणि सागर वानखेडे यांचे महाविद्यालयीन जीवनापासून प्रेमसंबंध होते. सोनालीचे लग्न राजू गजभियेसोबत झाल्यानंतरही त्यांच्यात संपर्क कायम होता. या कारणावरून राजू गजभियेने यापूर्वी खापरखेडा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. होळीनिमित्त सागर पुण्यावरून आपल्या गावी सावंगी येथे आला होता. त्यावेळी त्याने इंस्टाग्रामद्वारे सोनालीला भेटण्यासाठी बोलावले. गुरुवारी सकाळी सुमारे १० वाजता सागर खापरखेडा येथे पोहोचला. श्याम मंगल कार्यालयाजवळ सोनाली त्याच्या दुचाकीवर बसली आणि दोघेही तेथून निघाले. यावेळी सोनालीने आपल्या सोबत एक चाकू घेतला होता. दुसरीकडे, राजू गजभियेने मुलांना शाळेत सोडल्यानंतर दोघांचा पाठलाग सुरू केला. खापरखेडा-कोराडी मार्गावर कोलार नदीचा पूल ओलांडल्यानंतर सोनालीने मुद्दाम आपली पर्स खाली पाडली. सागरने दुचाकी थांबवून पर्स उचलण्यासाठी खाली वाकताच सोनालीने चाकू काढून त्याच्यावर दोन वार केले. त्याच वेळी घटनास्थळी पोहोचलेल्या राजू गजभियेनेही सागरवर चाकूने अनेक वार केले. या हल्ल्यात सागर गंभीर जखमी होऊन त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर दोन्ही आरोपी आपल्या घरी परतले. त्यानंतर ते पोलिस ठाण्यात जात असताना पोलिसांच्या डीबी पथकाने त्यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनीही खुनाची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी कोराडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा खून केला:नागपूरच्या खापरखेड्यात धक्कादायक घटना, दोघांना अटक
