![]()
तालुक्यात यंदा सुमारे २५ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची लागवड करण्यात आली असून हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. शिवारात सर्वत्र हिरवाई पसरली असून गहू पक्वतेच्या अवस्थेत, हरभरा काढणीच्या उंबरठ्यावर तर ज्वारीच्या कणसांना दाणे भरण्याची प्रक्रिया
.
तालुक्यातील विविध गावांमध्ये गहू पिकांची वाढ उत्तम झाली असून काही भागांत काढणीपूर्व तयारी सुरू झाली आहे. हरभरा आठवडाभरात काढणीला येईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. ज्वारी सध्या फुलोरा ते दाणे भरण्याच्या अवस्थेत असून मका पिकालाही चांगली वाढ दिसून येत आहे. शेतकरी मका पिकाला शेवटचे पाणी देत आहेत.
शेतकऱ्यांना मोठा दिलासा : गत खरीप हंगामात अवकाळी पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. मात्र यंदाच्या रब्बी पिकांची चांगली स्थिती पाहता खरीप मधील नुकसान काही प्रमाणात भरून निघेल, अशी आशा व्यक्त होत आहे. बाजार भावही समाधानकारक मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.
हवामान साथ देत असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह आहे. यंदा हिवाळा तुलनेने स्थिर राहिल्याने रब्बी पिकांना पोषक वातावरण मिळाले. सकाळच्या दवबिंदूंमुळे गहू आणि हरभऱ्याच्या वाढीस मदत झाली, तर तापमानातील मोठ्या चढ-उताराचा परिणाम कमी प्रमाणात झाला. कृषी तज्ज्ञांच्या मते, मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काढणीला सुरुवात झाली असेल. हवामान अनुकूल राहिल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ अपेक्षित आहे.
