सत्ताधाऱ्यांनी घाणेरड्या पद्धतीने निवडणुका लढवल्या:भाजप हा कागदावरचा पक्ष, जमिनीवरचा नाही; उद्धव ठाकरेंचा घणाघात




राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निकालानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत सत्ताधारी महायुतीवर बोचरी टीका केली. “सत्ताधाऱ्यांनी ही निवडणूक अत्यंत घाणेरड्या पद्धतीने, साम-दाम-दंड-भेदाचा वापर करून लढवली. मात्र, तरीही शिवशक्तीने जे यश मिळवले आहे, त्याने सत्ताधाऱ्यांना घाम फोडला आहे,” अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपने कागदावर शिवसेना संपवली असेल, पण जमिनीवरची शिवसेना ते कधीच संपवू शकत नाहीत, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. उद्धव ठाकरे म्हणाले, नुकत्याच झालेल्या २९ महापालिकांचे निकाल काल जाहीर झाले. सर्वच महापालिकांच्या प्रचाराला मी जाऊ शकलो नाही. तीन महापालिकांच्या प्रचाराला गेलो होतो. चंद्रपुरातही शिवसेनेचे चांगले नगरसेवक निवडून आलेत. परभणीमध्ये शिवसेनेने उत्तम यश प्राप्त केले. जिथे मी जाऊ शकलो नाही, त्या सर्व शिवसैनिकांची आणि मतदारांची दिलगिरी व्यक्त करतो. ज्या ज्या मतदारांनी शिवसेना आणि शिवशक्ती युतीला मतदान केले आणि तिनही पक्षांच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो आणि अभिनंदही करतो. सत्ताधाऱ्यांनी घाणेरड्या पद्धतीने निवडणुका लढवल्या उद्धव ठाकरे म्हणाले, या निवडणुका सत्ताधारी पक्षाकडून विचित्र आणि अत्यंत घाणेरड्या पद्धतीने लढवल्या गेल्या. आपल्या जीवन मरणाचा प्रश्न असल्याच्य पद्धतीने साम, दाम, दंड, भेद याच्या पलिकडे जाऊन त्यांनी सर्वकाही वापर केला. धाक दाखवणे, पैशांची लालूच, काही शिवसैनिकांना तडीपारीच्या नोटीसी, काहींना अटक केली. दंगली भडकवण्याचे प्रयत्न झाले. ठाण्यातील उमेदवारांना पैशांचे आमिष दाखवण्यात आले. काहींना बळजबरीने उमेदवारी मागे घ्यायला लावल्या. या सर्व गुंडागर्दीला न घाबरता, ज्या ज्या उमेदवारांनी ही लढत दिली आणि ज्यांनी निर्भयपणाने मतदान केले, हे सगळे लोकशाहीचे रक्षक आहेत. आमच्या यशाने सत्ताधाऱ्यांना घाम फोडला मुंबईत आमचा महापौर व्हावा, अशी इच्छा होती. तो आकडा आजतरी गाठू शकलो नाही. पण त्यांच्या खेळाला उत्तर देऊन शिवशक्तीने जे यश मिळवले, त्या निकालाने सत्ताधारी पक्षाला घाम फोडलाय. सत्ताधाऱ्यांनी एकही प्रयत्न असा सोडला नाही, जिथे शिवसेना उरणार नाही. एका गणिताचे उत्तर मला मिळाले नाही. आमच्या सभेला शिवाजीपार्क फुलून गेले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी महायुतीच्या सभेला गर्दी नव्हती. मग त्यांना खुर्च्यांनी मतदान केले का? रिकाम्या खुर्च्या मतदान कशा करू शकतात? असा टोला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना लगावला. पैसा येतो कुठून? ईडी-सीबीआय मागे का लागत नाही सत्ताधाऱ्यांनी शिवसेना संपवण्याचा अटोकाट प्रयत्न केला. निवडणुकीच्या शेवटच्या चार दिवसांत जे पैशांचे वाटप केले, ते चार दिवसांपूर्वी नव्हता. गेली चार वर्षे ते पैसा पेरत होते. आमचे निवडून आलेले अर्धेअधिक नगरसेवक आपल्या गळाला लावले. आता ते गाळाला गेलेत. चार वर्षे त्यांनी त्यांच्या आमदारांना नगरसेवकांना काही पदाधिकाऱ्यांना विकासनिधीच्या नावाखाली अमाप पैसा वाटला. निवडणुकीच्या तोंडाला सुद्धा मिक्सर, साड्यांचे वाटप झाले. हा पैसा येतो कुठून? त्या पैशाच्या सोर्सच्या मागे ईडी, आयकर विभाग, सीबीआय लागत कशी नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. २०१५ साली काळा पैसा नाहीसा व्हावा, यासाठी मोदींनी जी नोटबंदी केली होती, ती यशस्वी झाली का‌? याचे उत्तर देखील शोधले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला. भाजप हा शिवसेना संपवू शकत नाही भाजपने कागदावर शिवसेना संपवली असेल, पण जमिनीवरची शिवसेना ते संपवू शकत नाहीत हे कालच्या निवडणुकीने दाखवून दिलेले आहे. भाजप हा कागदावर आहे, पण जमिनीवर नाहीये. कारण तो जमिनीवर असता, तर त्यांना पक्ष फोडावे लागले नसते. पुसली जाणारी शाई वापरावी लागली नसती. यंत्रणेचा दुरुपयोग करावा लागला नसता. नियम बदलावे लागले नसते, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *