![]()
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांच्या झालेल्या निवडीला पक्षातूनच आव्हान देण्यात आल्याने खळबळ उडाली होती. मात्र, आता यावर पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी पहिली प्रतिक्रिया देत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ‘सुनेत्रा पवार यांची निवड पूर्णपणे कायदेशीर असून, सच्चिदानंद सिंह यांनी पाठवलेल्या नोटिशीत कोणतेही तथ्य नाही’, असा दावा तटकरे यांनी केला आहे. नेमके काय म्हणाले सुनील तटकरे? सुनेत्रा पवार यांच्या निवडीला आक्षेप घेणाऱ्या नोटिशीबाबत बोलताना सुनील तटकरे यांनी पक्षातील अंतर्गत वादाच्या चर्चा फेटाळून लावल्या. ते म्हणाले की, “अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांची झालेली निवड ही पूर्णपणे योग्य पद्धतीने आणि कायदेशीरच झालेली आहे. कुणीतरी एखादी व्यक्ती पत्र किंवा नोटीस पाठवते, याचा अर्थ पक्षात असंतोष आहे असा होत नाही. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात संपूर्ण पक्ष एकत्रितपणे आणि एकसंध होऊन काम करत आहे.” तसेच, सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत पाठवलेल्या या नोटिशीला कायदेशीर सल्ला घेऊनच योग्य ते उत्तर दिले जाईल, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. काय होता सच्चिदानंद सिंह यांचा आक्षेप? २८ जानेवारीला अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र, पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव आणि ज्येष्ठ नेते सच्चिदानंद सिंह यांनी या निवडीवर तांत्रिक आणि घटनात्मक आक्षेप नोंदवत अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केली होती. त्यांनी उपस्थित केलेले प्रमुख मुद्दे: या सर्व घडामोडींमुळे पक्षात प्रफुल्ल पटेल-सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार-पार्थ पवार असा अंतर्गत कलह सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, आता सुनील तटकरे यांनी स्वतः सुनेत्रा पवार यांच्या पारड्यात वजन टाकत या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. हेही वाचा.. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला पक्षातूनच थेट आव्हान!: राष्ट्रवादीत अंतर्गत कलह उफाळला; प्रफुल्ल पटेल म्हणाले- त्या नोटीसला फार महत्त्व देण्याचे कारण नाही अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली. मात्र, आता त्यांच्या या निवडीला थेट पक्षातूनच आव्हान देण्यात आले आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव आणि ज्येष्ठ नेते सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत नोटीस पाठवून सुनेत्रा पवारांच्या निवडीवर आक्षेप नोंदवला असून राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल्ल पटेल-सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार-पार्थ पवार असा अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सविस्तर वाचा..
सुनेत्रा पवारांची अध्यक्षपदी निवड कायदेशीरच:सच्चिदानंद सिंह यांच्या नोटिशीवर सुनील तटकरेंचे स्पष्टीकरण, म्हणाले- पक्षात कोणताही असंतोष नाही
