चंद्रकांत खैरेंचा अंबादास दानवेंवर थेट हल्लाबोल थेट अक्कल काढली:म्हणाले- चार दिवसांपासून निवडणूक प्रचारातून गायब; वाद चव्हाट्यावर




छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादिवशी शिवसेना ठाकरे गटामधील अंतर्गत वाद उघडपणे समोर आला असून, पक्षातील जुनी धुसफूस आता थेट सार्वजनिक पातळीवर पोहोचली आहे. मतदानाची प्रक्रिया सुरू असतानाच माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर जोरदार आणि तिखट शब्दांत टीका केली. माध्यमांशी संवाद साधताना खैरे यांनी दानवे यांची अक्कल काढली. या वक्तव्यामुळे ठाकरे गटातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. महापालिकेसाठी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी थेट पत्रकारांशी बोलत आपल्या मनातील असंतोष व्यक्त केला. गेल्या काही दिवसांपासून पक्षात जे अंतर्गत तणावाचे वातावरण होते, ते आज मतदानाच्या दिवशी उफाळून आले. खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका करत, पक्षातील निर्णयप्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एका वरिष्ठ नेत्याने अशा पद्धतीने जाहीरपणे आरोप केल्यामुळे ठाकरे गटातील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. या वादामागील मुख्य कारण म्हणजे माजी महापौर रशीद मामू ठरले आहे. यावरून चंद्रकांत खैरे प्रचंड संतप्त असल्याचे दिसून आले. रशीद मामू यांना मी तिकीट दिलेले नाही. ते तिकीट अंबादास दानवे यांनी दिले आहे. तिकीट वाटपाच्या संपूर्ण प्रक्रियेत मला अंधारात ठेवण्यात आले आणि दानवे यांनी स्वतःची मनमानी चालवली, असा थेट आरोप खैरे यांनी केला. या विधानातून पक्षातील निर्णय एकाधिकाराने घेतले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी अप्रत्यक्षपणे केला आहे. आपल्या नाराजीचा सूर अधिक तीव्र करत खैरे म्हणाले की, मी एकनिष्ठ माणूस म्हणून इतकी वर्षे पक्षात टिकून आहे. दानवे यांनी आतमध्ये काय व्यवहार केले आहेत, हे मला सर्व माहिती आहे. जे खरे निष्ठावंत आणि निवडून येण्याची क्षमता असलेले होते, त्यांची तिकिटे कापण्यात आली. या आरोपांमुळे केवळ तिकीट वाटपावरच नाही, तर पक्षातील विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. निवडणुकीच्या ऐन तोंडावर अशा आरोपांमुळे ठाकरे गटासाठी ही बाब अधिकच अडचणीची ठरत आहे. या वादाला संक्रांतीचा ‘तिळगुळ’ हे निमित्त ठरले. मकरसंक्रांतीनिमित्त पालकमंत्री संजय शिरसाट यांना पत्रकारांनी विचारले की, तुम्ही आज तिळगुळ कुणाला देणार? यावर शिरसाट यांनी, मी शिवसेनेचे निष्ठावंत नेते चंद्रकांत खैरे यांना तिळगुळ देणार, पण अंबादास दानवे यांना नाही, असे उत्तर दिले. या विधानानंतर अंबादास दानवे यांनी प्रतिउत्तर देताना, चंद्रकांत खैरे यांनी विधानसभा निवडणुकीत शिरसाट यांचे काम केले असावे, म्हणून ते त्यांना तिळगुळ देत आहेत, असा टोला लगावला. याच वक्तव्याने खैरे यांचा संताप अनावर झाला. मी गद्दारी करणारा माणूस नाही दानवे यांनी केलेल्या ‘फितुरी’च्या आरोपावर चंद्रकांत खैरे आज चांगलेच भडकले. दानवेला कळत नाही का? मी गद्दारी करणारा माणूस नाही. मी आयुष्यभर पक्षाशी प्रामाणिक राहिलो आहे, असे म्हणत त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे ठाकरे गटातील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. निवडणुकीच्या दिवशीच अशा शब्दयुद्धामुळे कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. चार दिवसांपासून निवडणूक प्रचारातून गायब या सगळ्या घडामोडींनंतर खैरे यांनी आणखी एक मोठा दावा केला आहे. अंबादास दानवे हे गेल्या चार दिवसांपासून निवडणूक प्रचारातून गायब असल्याचे त्यांनी सांगितले असून, ही बाब त्यांनी थेट ‘मातोश्री’पर्यंत, म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवली असल्याचा दावा केला आहे. आता मतदान होऊ द्या. त्यानंतर मी अंबादास दानवे यांच्या विरोधात मोठी पत्रकार परिषद घेऊन सर्व सत्य जनतेसमोर आणणार आहे, असा इशाराही चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे. त्यामुळे मतदानानंतर ठाकरे गटात आणखी मोठा राजकीय स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *