नवी मुंबईत सरकारी यंत्रणेला दावणीला बांधण्याचा प्रयत्न:शिंदे गटाच्या खासदाराचा भाजपवर आरोप; CP ताटातले मांजर झाल्याचा घणाघात




उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी भाजपवर मतदारांना धमकावल्याचा आरोप केला आहे. नवी मुंबईत सरकारी यंत्रणेला दावणीला बांधण्याचा प्रयत्न झाला आहे. पोलिस आयुक्तही कुणाच्या तरी ताटातले मांजर झाल्याचे चित्र आहेत. हा सर्व प्रकार चुकीचा आहे, अन्यथा आम्हाला सुद्धा कायदा हातात घ्यावा लागेल, असे ते म्हणालेत . खासदार नरेश म्हस्के म्हणाले, महापालिका निवडणुका सुरू आहेत. उमेदवारांना प्रोत्साहन देण्यासाठी मी प्रत्येक बुथला भेटी देत आहे. पण पोलिसांना हाताशी धरून बाहेरून माणसे आणून या ठिकाणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मतदारांना धमकावण्यात येत आहे. त्यांच्यावर खोट्या केसेस टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिस आयुक्तांनी कुणाच्या तरी हातचे बाहुले बनू नये. महापालिका निवडणूक आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने लढत असलो तरी शेवटी आम्हीही सत्तेत आहोत हे त्यांनी लक्षात घ्यावे. कारण, नवी मुंबईत सध्या दादागिरी करून मतदारांचे ओळखपत्र तपासणे, मतदारांना मारणे असे प्रकार सुरू आहेत. आमच्या 2 उमेदवारांना पोलिसांनी ताब्यात घेतले ते पुढे म्हणाले, पोलिसांनी आमच्या 2 उमेदवारांना ताब्यात घेतले. काही गुंड प्रवृत्तीचे लोक आमच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करत होते. उमेदवारांना काम करू देत नव्हते. आम्ही पोलिसांना त्याची माहिती दिली. पण शेवटी अती झाल्यामुळे आमचे उमेदवार जाब विचारण्यासाठी गेले. पण पोलिसांनी त्यांनाच अटक केली. पोलिसांचा वापर करून उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यापासून मज्जाव करणे हा साफ चुकीचा प्रकार आहे. रस्त्याने चालणाऱ्या माणसाला मारणे, मतदानाला जाऊ नका म्हणून दादागिरी करणे, ही हुकूमशाही आहे का? सीपी कुणाच्या ताटातले मांजर आहेत का? नवी मुंबईचे पोलिस आयुक्त कुणाच्या ताटातले मांजर आहेत का? सध्या जे काही सुरू आहे ते साफ चुकीचे आहे. आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. कुणाच्या तरी दमदाटीमुळे पोलिसांचा नाईलाज झाला आहे. काही जण स्वतःला नवी मुंबईचे सम्राट समजतात. ते मंत्री निवडणूक आयोगावरही टीका करतात. हा प्रकार सरकारी यंत्रणेला दावणीला बांधण्याचा आहे, असे म्हस्के म्हणाले, उल्लेखनीय बाब म्हणजे नरेश म्हस्के यांनी या प्रकरणी पोलिसांवर टीका करताना या प्रकरणात गृह मंत्रालयाचा कोणताही हात नसल्याचेही प्रामुख्याने अधोरेखित केले. या प्रकारात गृह मंत्रालयाचा कोणताही हात नाही. कुणी तरी स्वतःला नवी मुंबईचे सम्राट समजतात. त्यांच्याकडून जोरजबरदस्तीने असे प्रकार सुरू आहेत, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *