अमरावती विद्यापीठात पत्रकारिता परीक्षेचा गोंधळ, परीक्षा रद्द:चौथ्या सेमिस्टरला तिसऱ्याचा पेपर; आठवडाभरात पुन:परीक्षा
![]()
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात पत्रकारितेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या चौथ्या सेमिस्टरच्या परीक्षेत मोठा गोंधळ निर्माण झाला. विद्यार्थ्यांना चक्क तिसऱ्या सेमिस्टरचा पेपर मिळाल्याने मंगळवारी होणारी परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आली. या प्रकारामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे सरसकट चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करण्याची मागणी केली, मात्र विद्यापीठाने ती अमान्य करत आठवडाभरात पुन:परीक्षा घेण्याचे स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी एमए (पत्रकारिता) चौथ्या सेमिस्टरची ‘आंतर सांस्कृतिक संवाद’ या विषयाची परीक्षा होती. मात्र परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर विद्यार्थ्यांना ‘आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संवाद’ या तिसऱ्या सेमिस्टरच्या विषयाची प्रश्नपत्रिका मिळाली. हा विषय त्यांनी यापूर्वीच तिसऱ्या सेमिस्टरमध्ये दिला असल्याने विद्यार्थी गोंधळले. त्यांनी ही बाब पर्यवेक्षकांच्या निदर्शनास आणून दिली. केंद्रचालकांनी विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क साधला असता, तांत्रिक अडचणींमुळे वेळेत योग्य प्रश्नपत्रिका उपलब्ध करणे शक्य झाले नाही. त्यामुळे अखेर ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. चुकीची प्रश्नपत्रिका विद्यापीठाकडून पाठवण्यात आल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास झाला. त्यामुळे त्यांना सरसकट उत्तीर्ण करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. या गोंधळाबाबत बोलताना अमरावती विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी सांगितले की, “एमए (पत्रकारिता) विषयाची परीक्षा घेताना चुकीची प्रश्नपत्रिका दिल्याचे स्पष्ट झाले आहे. हा मॉडरेशन स्तरावरील गोंधळ आहे. त्यामुळे ती परीक्षा रद्द करावी लागली.” ते पुढे म्हणाले, “येत्या आठवडाभरात पुन:परीक्षा घेऊन संबंधित विद्यार्थ्यांचे निकाल व त्यानंतरची प्रवेश प्रक्रिया अडचणीत येऊ दिली जाणार नाही.”
