राजुरवाडीजवळ जंगलाला आग, वीज केंद्राजवळ पोहोचली:अधिकारी-कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

0
4aaee6d8-1429-4b91-95ba-efe62f3f9546_1777480285912.jpg




राजुरवाडी गावाजवळच्या जंगल परिसरात आज, बुधवारी दुपारी भीषण आग लागली. ही आग महावितरणच्या वीज केंद्राजवळ पोहोचल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवून संभाव्य धोका टाळण्यात यश आले. वनविभागाच्या कम्पार्टमेंटमध्ये दुपारच्या सुमारास ही आग लागली. वाढत्या तापमानामुळे आणि कोरड्या झाडाझुडपांमुळे आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. ही आग वेगाने महावितरणच्या वीज केंद्राच्या दिशेने सरकत असल्याने तेथील अभियंते आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गावाचे पोलीस पाटील अतुल बोंडे यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ तिवसा नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या अमरावती जिल्ह्यासह तालुक्यात ४६ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान आहे. या वाढत्या तापमानामुळे आगीच्या घटना घडण्याची शक्यता अधिक असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ही आग विझवण्यासाठी मंगेश वाघ, त्रिफूल ढेवले, धीरज बोंडे, अतुल वानखडे आणि महावितरणचे सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले. ग्रामस्थांनीही यात मोलाची मदत केली. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आग वेळीच आटोक्यात आली आणि मोठे नुकसान टळले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed