परतवाडा-चिखलदरा मार्गावर अवैध सागवान जप्त:वनविभागाच्या कारवाईत दोघांना 2 दिवसांची वनकोठडी
![]()
परतवाडा-चिखलदरा मार्गावर वनविभागाच्या फिरत्या पथकाने नाकेबंदी दरम्यान अवैध सागवान वाहतूक उघडकीस आणली. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना वनकोठडी सुनावण्यात आली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच ४०/बीएल ५९५२ क्रमांकाच्या एका संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत वाहनात सागवानाच्या २३ चरपटांची (खांब) अवैध वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. जप्त केलेल्या सागवानाचे प्रमाण १.८०४ घनमीटर असून, त्याची किंमत १ लाख ६९ हजार ७३६ रुपये आहे. या कारवाईत सागवानासह दीड लाख रुपये किमतीचे वाहनही जप्त करण्यात आले. अशा प्रकारे वनविभागाने एकूण ३ लाख १९ हजार ७३६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी अब्दुल राऊफ अब्दुल फारूक (वय ४८, रा. ब्राह्मणवाडा थडी) आणि अब्दुल गणी अब्दुल सत्तार (वय ५४, रा. जमीर कॉलनी, चांदूरबाजार) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पुढील तपासासाठी दोन दिवसांची वनकोठडी सुनावली. वनक्षेत्रपाल पी. पी. बावनेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. फिरत्या पथकातील वनपाल विजय तायडे, आर. जी. गायकी (बिहाली), वनरक्षक सी. एस. पेंढारकर, एम. एन. सानप, डी. जी. बेठेकर, आर. यू. मकेश्वर, वी. आर. तोटे, श्याम साबळे, के. एच. काळे, पी. व्ही. बुरघाटे, तसेच वाहनचालक प्रशांत चक्रे आणि मदतनीस विशाल गायकवाड यांनी ही संयुक्त कारवाई यशस्वी केली. उपवनसंरक्षक अग्रिम सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल विजय तायडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अवैध वृक्षतोड, वनउपज वाहतूक, अवैध शिकार किंवा वनवणवा यासंदर्भातील कोणतीही माहिती १९२६ या ‘हॅलो फॉरेस्ट’ टोल-फ्री क्रमांकावर द्यावी. नागरिकांच्या सहकार्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यास आणि जंगलाचे संरक्षण करण्यास मदत होईल.
