![]()
राज्यातील विविध महानगरपालिकांच्या निवडणुकीत मतदानाच्या दिवशी अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. मतदारांना पैशांचे वाटप, बोगस मतदान आणि बोटावरील शाई पुसून दुसऱ्यांदा मतदान करण्यासारख्या गैरप्रकारांनी निवडणूक प्रक्रियेला गालबोट लावले आहे. यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पुण्यातील प्रभाग क्रमांक 24 मध्ये येरवाडा तुरुंगात असलेल्या एका आरोपीच्या नावे चक्क कुणीतरी मतदान केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपी प्रत्यक्ष तुरुंगात असतानाही त्याचे मतदान केंद्रावर मतदान झाल्याचे समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक 24 मधील सरस्वती मंदिर या मतदान केंद्रांवर बोगस मतदान झाल्याचे समोर आले आहे. जो व्यक्ती येरवडा जेलमध्ये आहे, त्याच्या नावावर सुद्धा मतदान करण्यात आले आहे. याबाबत जे उमेदवार आहेत तसेच कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून निवडणूक अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली. मात्र, आयोगाकडून कुठलेही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, प्रभाग क्रमांक 24 ड मध्ये भाजपचे पुण्यातील निवडणूक प्रमुख गणेश बीडकर हे उमेदवार आहेत. त्यांना राष्ट्रवादीच्या गणेश नवघरे, शिवसेनेच्या प्रवीण धंगेकर यांचे आव्हान आहे. त्यामुळे येथील लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यात या प्रभागात झालेल्या बोगस मतदानामुळे खळबळ उडाली आहे. मतदान केंद्रावर पोहोचण्याआधीच महिलेच्या नावावर मतदान असाच काहीसा प्रकार प्रभाग क्रमांक 21 मधील कटारिया हायस्कूल येथील मतदान केंद्रावर पाहायला मिळाला आहे. मतदान केंद्रावर पोहोचण्याच्या आधीच एका महिलेच्या नावाने मतदान झाले असल्याचे उघडकीस आले आहे. शेख हसिना असे या महिलेचे नाव आहे. गेल्या 35 वर्षांपासून त्या महिला याच मतदान केंद्रावर मतदान करत आहेत. मात्र आज त्यांच्या नावाने आधीच कोणीतरी मतदान केल्याचे समोर आले आणि एकच खळबळ उडाली. या महिलेने सवाल उपस्थित केला असता त्यांच्याकडून पोस्टल मतदान करून घेतले आहे.
आरोपी येरवडा जेलमध्ये, इकडे केंद्रावर मतदान!:पुण्यात मतदान केंद्रांवर बोगसगिरी, निवडणूक अधिकाऱ्यांकडून ठोस उत्तर नाही
