पत्नीच्या मरणास कारण ठरणाऱ्या नवऱ्याला सक्तमजुरी आणि 25 हजार 500 रुपये रोख दंड
नांदेड(प्रतिनिधी)-लग्न झाल्यानंतर आपल्या पत्नीला त्रास देवून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या पतीला तिसऱ्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी वेगवेगळ्या कलमांप्रमाणे वेगवेगळ्या सक्तमजुरीच्या शिक्षा ठोठावल्या आणि एकूण 25 हजार 500 रुपये रोख दंड सुध्दा ठोठावला. या प्रकरणातील एका आरोपीचा मृत्यू खटल्या दरम्यान झालेला आहे. या सर्व प्रकारात त्या महिलेने जन्म दिलेली तिन बालके मात्र आईशिवाय पोरकी झाली आहेत.
दि.5 जून 2018 रोजी आमदरवाडी ता.भोकर येथील शामराव विठ्ठोबा वागदकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी शिवानीचा विवाह मौजे सोनवाडी ता.किनवट येथील विष्णुदास यादव टारपे सोबत सन 2008 मध्ये झाला. या संसारात त्यांना दोन मुले झाली. पण शिवानीच्या सासरची मंडळी तिला हुंड्यासाठी त्रास देत होती. याबाबत सन 2013 मध्ये भोकर न्यायालयात कार्यवाही दाखल करण्यात आली होती. त्यानंतर काही नातलगांनी मध्यस्थिती केल्यामुळे आणि मुलीला चांगले वागवणार अशी हमी दिल्याने तिला परत सोनवाडी येथे पाठविले. पुढे त्यांना तिसरा मुलगा झाला.
तरीही सासरची मंडळी ऍटो खरेदी करण्यासाठी माहेरहुन पैसे आण म्हणून त्रास देतच होती. एकदा मी स्वत: जावून समजून सांगितले होते. पण त्यांच्यात काही फरक पडला नाही. दि.25 मे 2018 रोजी मध्यरात्री 1 वाजता माझा जावाई विष्णुदास यादव टारपेने फोन करून सांगितले की, तुमच्या मुलीची तब्येत बरी नसल्याने तिला म्हैसा येथे दवाखान्यात आणले आहे. मी मुलीला भेटायला गेलो तेंव्हा तिने सांगितले की, माझा पत्ती विष्णुदास टारपे, याचे वडील यादव टारपे आणि त्यांची आई गंगुबाई टारपे व इतरांनी मला 24 मे रोजी माझा पतीचे दुसरे लग्न करायचे आहे. त्यातून आम्हाला पैसे भेटतील असे सांगितल्याने मला मानसिक त्रास झाला आणि या लोकांच्या त्रासानेच मी विषारी औषध प्राशन केले आहे. मी माझ्या मुलीला उपचारासाठी नांदेडला आणले. परंतू तिने उपचारांना प्रतिसाद दिला नाही आणि 4 जून 2018 रोजी तिचे उपचारादरम्यान दवाखान्यात निधन झाले.
ईस्लापूर पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 306, 498(अ), 323, 504 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करून तपास तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक विठुबोने यांच्याकडे दिला. विठुबोने यांनी या प्रकरणाचा तपास करून विष्णुदास यादव टारपे, यादव टारपे आणि गंगुबाई यादव टारपे या तिघांविरुध्द नांदेड न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी तिसऱ्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांकडे चालली. न्यायाधीशांनी त्यांच्या समक्ष आलेल्या पुराव्यांच्या आधारावर शिवानीचा नवरा विष्णुदास यादव टारपेला भारतीय दंड संहितेच्या कलम 306 नुसार तिन वर्ष सक्तमजुरी आणि 20 हजार रुपये रोख दंड तसेच कलम 398(अ) साठी दोन वर्ष सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये रोख दंड तसेच कलम 323 साठी 6 महिने सक्तमजुरी आणि 5 रुपये रोख दंड अशा शिक्षा ठोठावल्या. दंडातील रक्कम जमा झाल्यानंतर त्यातील 20 हजार रुपये शिवानीचे वडील आणि इतर नातलगांना देण्यास सांगितले. या सर्व शिक्षा विष्णुदास टारपेला एकत्रीत भोगायच्या आहेत. खटल्याच्या सुनावणी दरम्यान विष्णुदास टारपेचे वडील यादव टारपे यांच्या मृत्यू झाला होता. या खटल्यातील आरोपी गंगुबाई यादव टारपे यांची या प्रकरणातून सुटका झाली.
या खटल्या सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ऍड. महम्मद अब्बास कुरेशी यांनी बाजू मांडली. पोलीस ठाणे सिंदखेड येथील महिला पोलीस अंमलदार एस.पी.गिमेकर यांनी पैरवी अधिकाऱ्याची भुमिका पुर्ण केली.
Post Views: 106