राजकारणात तेरा दिवसांची परंपरा लागू नाही?  सुतकासाठी वेळ नाही, सत्तेसाठी मात्र मुहूर्त!  


टाइम्स ग्रुपच्या लोकसत्ता या मराठी दैनिकाने रविवारी पहिल्या पानावर विशेष संपादकीय प्रसिद्ध केले. लोकसत्तामध्ये पहिल्या पानावर संपादकीय छापले जाते, तेव्हा तो विषय केवळ राजकीय नसून सामाजिक आणि नैतिक पातळीवरही गंभीर असतो. त्या संपादकीयाचे शीर्षक आहे .  “सुमित्रा ताई, आपण चुकलात”. हे शीर्षकच आज महाराष्ट्राला विचार करायला भाग पाडणारे आहे.

संपूर्ण महाराष्ट्र दुःखात आहे. सुनिता वहिनींनाही दुःखआहेच, त्याबाबत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. संपूर्ण देशाने पाहिले की अजितदादा पवार यांची अंतिम क्रिया शास्त्रोक्त पद्धतीने पार पडली. भारतीय परंपरेनुसार तेरा दिवस सुतक पाळले जाते. त्या काळात रोजची कामे थांबवली जातात आणि सुतक समाप्त झाल्यानंतरच विधीपूर्वक जेवण केले जाते.

असे असताना लोकसत्ताच्या संपादकीयात थेट प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे
दादाच्या चितेचा अग्नी शांतही झाला नव्हता, सुतक संपले नव्हते, मग उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची इतकी घाई का? तेरा दिवस थांबता आले नसते का? सत्तेची एवढी आवश्यकता होती का? जर सत्तेची आवश्यकता नव्हती, तर जे घडले ते नक्की काय होते, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.

काही लोक उदाहरण देतात की राजीव गांधी यांनीही आई इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर सहाच तासांत पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. मात्र त्या वेळी इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान होत्या. पंतप्रधानपद रिक्त राहिल्यास घटनात्मक संकट निर्माण झाले असते, म्हणून तो निर्णय अपरिहार्य होता. याच धर्तीवर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले, आणि त्यांच्या निधनानंतर गुलजारीलाल नंदा यांनी तात्पुरते पंतप्रधानपद स्वीकारले.

परंतु उपमुख्यमंत्री पद घटनात्मक पद नाही. त्या पदासाठी कोणतेही घटनात्मक संकट नव्हते. सरकारवरही कोणतेही संकट नव्हते, आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यावरही नव्हते. त्यामुळे घाई करण्याचे कोणतेही कारण नव्हते.

इतिहासात आणखी उदाहरणे आहेत. बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांनी राबडी देवी यांना मुख्यमंत्री केले, पण प्रत्यक्षात सत्ता लालूच चालवत होते. तामिळनाडूत एम.जी.आर. यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी जानकी यांना मुख्यमंत्री करण्यात आले; त्याचे परिणाम काय झाले, हे संपूर्ण देशाने पाहिले. आंध्र प्रदेशमध्ये एन.टी.आर. यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्री करण्यात आले आणि त्या पक्षाची पुढील अवस्था काय झाली, हेही सर्वज्ञात आहे.

मग प्रश्न उरतो  हे सर्व करण्यासाठी कोणाने दबाव टाकला? की ही स्वतःची इच्छा होती? हा प्रश्न लोकसत्ताच्या संपादकीयात थेट विचारण्यात आला आहे.पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतरचा अजितदादा पवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. पालकमंत्री असूनही अजितदादा बापट साहेबांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकले नव्हते; ते तिसऱ्या दिवशी गेले होते. त्यानंतर परतताना कुणीतरी निवडणुकीबाबत चर्चा सुरू केली. तेव्हा अजितदादा संतापले होते. लाज वाटत नाही का? आत्ताच मृत्यू झाला आहे आणि तुम्हाला निवडणुकीची चिंता आहे? आमच्या घरात मृत्यू झाला तर तिसऱ्या दिवशी आम्ही असे प्रश्न विचारतो का? असे कठोर शब्द त्यांनी वापरले होते.

पण दादा, आज हेच आपल्या घरात घडले आहे. आणि हे आपल्या लोकांनीच केले आहे. ज्यांच्यावर आपण सर्वाधिक विश्वास ठेवला  सुनील तटकरे. प्रफुल्ल पटेल हे व्यावसायिक वृत्तीचे नेते; जिथे नफा दिसतो, तिथे ते जातील. छगन भुजबळ यांना शरद पवारांनी जालना बोट धरून राजकारणात आणले; पण ईडीचा विषय आला आणि शरद पवारांचे बोट सोडायला त्यांनी एक मिनिटही घेतला नाही. मंत्री होईपर्यंत ते अजित पवारांविरोधातही बोलत होते.

हे सर्व वाचल्यानंतर लोकसत्ताच्या संपादकीयातून एकच निष्कर्ष समोर येतो.  राजकारण निष्ठुर असते . हा संपूर्ण खेळ भारतीय जनता पक्षाने आखलेला आहे. तीन वर्षे सत्तेत राहण्यासाठी काही लोक कोणतीही किंमत मोजायला तयार आहेत.

राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर सोनिया गांधींनाही पंतप्रधान होण्याची संधी होती. पण त्या वेळी सीताराम केसरी काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि नरसिंहराव पंतप्रधान झाले. गांधी कुटुंब त्या काळात राजकारणापासून दूर राहिले. पाच वर्षांनंतर काँग्रेस अडचणीत आली, तेव्हा पक्ष वाचवण्यासाठी सोनिया गांधी पुन्हा सक्रिय झाल्या आणि अध्यक्ष झाल्या. त्यांनी स्वतः पंतप्रधानपद स्वीकारले नाही; डॉ. मनमोहन सिंग यांना संधी दिली.

आज अजितदादा पवारांवर प्रेम करणारे कार्यकर्ते, गिरीश बापट यांच्या मृत्यूनंतरचा तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत  स्वतःला समजावण्यासाठी, स्वतःला दिलासा देण्यासाठी. कारण काही दृश्ये असतात, जी राजकारणापेक्षा मोठी असतात… आणि काही निर्णय असे असतात, जे इतिहास विसरत नाही.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *