औंढ्यातील मजुराचा तेलंगणात तलावात बुडून मृत्यू:निजामाबाद जिल्ह्यातील देगम शिवारातील घटना; हळद काढणीसाठी गेले होते कुटुंब




तेलंगणा राज्यातील देगम येथे हळद काढणीसाठी गेलेल्या पिंपळदरी (ता. औंढा) येथील मजूराचा पाण्याच बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यांचा मृतदेह घेऊन त्यांचे कुटुंबिय मंगळवारी ता. २४ गावाकडे निघाले आहेत. या घटनेमुळे पिंपळदरी गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळदरी येथील मजूर भारत बर्गे यांच्याकडे शेती नसल्यामुळे दरवर्षी हळद काढणीसाठी तेलंगणा राज्यात जातात. दरवर्षी प्रमाणे यावर्षीहे भारत बर्गे हे त्यांची पत्नी, आई, वडिल व दोन मुलांसह तेलंगणा राज्यात गेले होते. त्या ठिकाणी निजामाबाद जिल्हयातील देगम शिवारात हळद काढणीचे काम सुरु होते. सोमवारी ता. २३ दुपारच्या सुमारास हळद काढणीनंतर भारत हे बाजूलाच असलेल्या तलावात मासे पकडण्यासाठी उतरले होते. दरम्यान, या तलावात काही मच्छीमारांनी जाळे टाकून ठेवले होते. तलावात मासे पकडण्यासाठी उतरलेल्या भारत यांचा जाळ्यात पाय अडकला. त्यामुळे त्यांना बाहेर निघताच आले नाही. बराच वेळ होऊनही ते परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी पाहणी केली असता भारत यांचा मृतदेह तलावात आढळून आला. त्या ठिकाणी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मयत भारत यांचा मृतदेह घेऊन त्यांचे कुटुंबिय पिंपळदरीकडे निघाले असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. मयत भारत बर्गे यांच्या पश्‍चात आई, वडिल, पत्नी, एक मुलगी व एक मुलगा असा परिवार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे पिंपळदरी गावावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *