69 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर:109 जागांसाठी निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा, अमरावती जिल्ह्यात तयारी पूर्ण




अमरावती जिल्ह्यात ६९ ग्रामपंचायतींच्या १०९ जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा प्रशासनाने मंगळवारी, २४ फेब्रुवारी रोजी यासाठीची अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे. ही मतदार यादी संबंधित ग्रामपंचायती, तलाठी कार्यालये, तसेच तालुका स्तरावरील पंचायत समिती आणि तहसील कार्यालयांमध्ये नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध आहे. अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यामुळे आता लवकरच या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. एकूण १०९ जागांपैकी ९८ सदस्य आणि ११ सरपंचांच्या जागांसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांचे निधन किंवा राजीनाम्यामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत, तर काही जागांवर सुरुवातीपासूनच उमेदवार न मिळाल्याने त्या रिक्त राहिल्या आहेत. या मतदार यादीचे प्रारुप १६ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावर २० फेब्रुवारीपर्यंत आक्षेप आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. हरकतींवर सुनावणी घेतल्यानंतर मंगळवारी अंतिम मतदार यादी घोषित करण्यात आली. अमरावती तालुका वगळता जिल्ह्यातील इतर १३ तालुक्यांमधील गावांमध्ये या पोटनिवडणुका होणार आहेत. यामध्ये तिवसा, भातकुली, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, मोर्शी, वरुड, अचलपूर, चांदूर बाजार, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, धारणी आणि चिखलदरा या तालुक्यांचा समावेश आहे. या प्रत्येक तालुक्यातील अनेक गावांमध्ये रिक्त जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *