![]()
कत्तलीसाठी गोवंश जनावरांची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्या आणि भंडारा, गोंदिया तसेच नागपूर जिल्ह्यांत गुन्हेगारी कारवायांद्वारे दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात ‘सम्राट टोळी’विरुद्ध अखेर मकोका अंतर्गत कडक कारवाई करण्यात आली आहे. नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी 3 जुलै रोजी या टोळीविरुद्ध मकोका कायद्याचे कलम वाढवण्याचे आदेश दिले. टोळीप्रमुख सम्राट कांतीलाल येवले (वय 33, रा. गोरेगाव) आणि त्याचे साथीदार यांच्यावर हा कायदेशीर फास आवळण्यात आला असून, यामुळे आंतरजिल्हा गोवंश तस्करांचे धाबे दणाणले आहेत. 21 जून रोजी लाखनी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, सडक अर्जुनी आणि साकोली मार्गावरून लाखनीच्या दिशेने गोवंश तस्करांचे वाहन येत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने नाकेबंदी केली. संशयास्पद पिकअप वाहन (क्रमांक MH 40 DC 1395) थांबवले असता, पोलिसांना पाहताच टोळीप्रमुख सम्राट येवले वाहन सोडून पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता, त्यात अत्यंत निर्घृणपणे कोंडलेली 14 गोवंश जनावरे आढळून आली, ज्यातील एका जनावराचा गुदमरून मृत्यू झाला होता. याप्रकरणी लाखनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. टोळीप्रमुख सम्राट कांतीलाल येवले याने आपला साथीदार हर्षल योगेश श्रावणकर आणि इतर नवीन सदस्यांना सोबत घेऊन ‘सम्राट’ नावाची टोळी तयार केली होती. या टोळीने परिसरात आपले वर्चस्व आणि दहशत निर्माण केली होती. सम्राट येवले याच्यावर 2018 पासून लाखनी, डुग्गीपार, नवेगावबांध, गोरेगाव (जि. गोंदिया) आणि मौदा (जि. नागपूर) पोलिस ठाण्यांमध्ये गोवंश तस्करीचे तब्बल 9 गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांकडून वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही या टोळीच्या कारवाया थांबत नव्हत्या. या संघटित गुन्हेगारीचा समूळ उच्चाटन करण्यासाठी भंडारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांनी लाखनी पोलिसांना या टोळीविरुद्ध मकोका अंतर्गत प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आशिष गजभिये यांनी कायदेशीर निकषांवर आधारित प्रस्ताव तयार करून तो नागपूर येथील विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवत टोळीवर मकोका लावण्याचे आदेश दिले.
भंडारा पोलिसांची मोठी कारवाई:3 जिल्ह्यांत गोवंश तस्करी करणाऱ्या कुख्यात 'सम्राट टोळी'वर 'मकोका'चा दणका
